द्राक्षे स्वस्तात मस्त

परदेशी बाजारपेठेने देशी द्राक्षांना रासायनिक धक्का दिल्याने अनुभवातून शहाण्या झालेल्या बागायतदारांनी यंदा निर्यातीची द्राक्षे अधिक सकस आणि चवदार करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्नपूर्वक औषधांच्या मात्रा प्रमाणात दिल्याने यंदा पुन्हा चव आली आहे. उत्पादनात ३0 ते ४0 टक्के वाढ झाली ती वेगळीच. त्याचाच परिणाम म्हणून भारतीयांच्या जिभेवर यंदा स्वस्तात मस्त द्राक्षेही रेंगाळणार आहेत.
अलीकडेच नाशिक, पुणे, सांगली, सातारा व मराठवाड्यातली द्राक्षे बाजारात येऊ लागली असून, ४0 ते १00 रुपये किलोचा दर आहे. दोन वर्षांपूर्वी युरोपात निर्यात केलेल्या द्राक्षांमध्ये क्लोरमेक्वॉट क्लोराईडचा अंश आढळल्याने तेथील द्राक्षे माघारी पाठविण्यात आली होती. देशी उत्पादकांना २५0 कोटींचा फटकाही बसला होता. त्यामुळे निर्यातीसाठी कोणती द्राक्षे असावी, याकरिता जाणकारांनी नवे तंत्र विकसित केले आहे. कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाने बागायतदारांना याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे.
नाशिक ग्रेप्स बनला ब्रँड!
महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीनंतर नाशिकच्या द्राक्षांना तेथील भौगोलिक स्थितीमुळे विशिष्ट रंग व चव असते, असा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे ‘नाशिक ग्रेप्स’ हा ब्रँड बनला आहे. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीसाठी १५ हजार ४९९ बागांची कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाकडे नोंद झाली आहे.
निर्यातही वाढणार!
द्राक्ष निर्यातीसाठी राज्यातून १७ हजार ८८५ द्राक्ष बागायदारांनी १४ हजार हेक्टर क्षेत्राची राज्य सरकारच्या कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाकडे निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.
गेल्या वर्षी १२ हजार हेक्टर क्षेत्राची निर्यातक्षम द्राक्षांसाठी नोंदणी झाली होती. साधारण एका हेक्टरवर सरासरी २३ मेट्रिक टन द्राक्षाचे उत्पादन अपेक्षित असते.


अधिक वाचा
.........................................................