कृत्रिम ढगांची निर्मिती आणि पाऊस

साध्या मीठाचा वापर करून ढगांचं बीजारोपण करण्याची एक सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. जैविक पदार्थांच्या शेकोटीद्वारे उच्च तापमान निर्माण करायचं आणि या आगीच्या ज्वाळांवर मीठ किंवा मीठाचं पाणी शिंपडून हे साध्य करता येतं. उच्च तपमानाच्या ज्वाळा निर्माण करण्यासाठी साधं एका ठिकाणी स्थिर असलेल्या किंवा हलवता येण्यासारख्या मुशीत जैविक पदार्थ जाळले जातात. यासाठी उत्तम प्रकारची जाळण्याची सुविधा असलेलं नैसर्गिक यंत्र वापरता येतं. त्यामध्ये ज्याद्वारे ही आग फुलवता येईल अशा फुंकणी किंवा ब्लोअर असणेही आवश्यक आहे. यासाठी इलेक्ट्रिक ब्लोअर उपयुक्त ठरतो. या सर्व गोष्टी कोणत्याही खेडेगावात सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. इलेक्ट्रिकल ब्लोअर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या छोट्या मशिनरीच्या दुकानात मिळू शकतो. गावात वीजेची सुविधा नसल्यास लोहार किंवा सोनाराकडे असलेला साधा ब्लोअरसुद्धा वापरता येऊ शकेल. याची कार्यक्षमता कमी असली तरीही तो उपयुक्त आहे. जाळण्यासाठी मुस आणि ब्लोअर नसल्यास मोकळ्या जागेवर शेकोटी पेटवून त्यावर मीठ किंवा मीठाचं पाणी शिंपडून या तंत्राचा अवलंब करता येऊ शकतो.
याचा शोध कसा लागला?
महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील सुजलेगावमध्ये काही ठिकाणी डॉ. राजा मराठे यांनी 2010 मध्ये वरूणयंत्राचे प्रयोग केले. (जमिनीवर शेकोटी पेटवून त्याद्वारे आभाळातील पाणी म्हणजे पाऊस पाडण्याचे प्रयोग)
अधिक माहितीसाठी
 http://www.marathi.varunyantra.org/ या संकेतस्थळावर भेट द्या.
अधिक वाचा

द्राक्ष निर्यातीसाठी नवीन बाजारपेठांचा शोध हवा


द्राक्ष उत्पादन व निर्यातीत वृद्धी होण्यासाठी राज्यातील नाशिक, सांगली, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर इ. जिल्ह्यांना कृषी निर्यात क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ समन्वय संस्था म्हणून काम पाहते. कृषी निर्यात क्षेत्रांतर्गत अत्याधुनिक सुविधांचा वापर करून निर्यातदार आणि द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीला गती दिली पाहिजे. 
भारतातील सन 2010-11 मधील फळ उत्पादन 74.88 दशलक्ष टन होते, तर जागतिक फळ उत्पादन 599.30 दशलक्ष टन इतके होते. फळ उत्पादनामध्ये चीन प्रथम स्थानावर असून त्यांचे फळ उत्पादन 122.18 दशलक्ष टन आहे. त्या खालोखाल भारताचे उत्पादन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला परकीय चलन मिळवून देण्याच्या दृष्टीने फळपिकांना चांगलेच महत्त्व आहे. द्राक्ष उत्पादनाचा विचार करता जागतिक द्राक्ष उत्पादन सन 2010-11 मध्ये 67.32 दशलक्ष टन होते. यामध्ये चीन (8.65 दशलक्ष टन) प्रथम स्थानावर, त्या खालोखाल इटली, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, तुर्की, चिली, अर्जेंटिना व त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारताचे सन 2009-10 मध्ये द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र सुमारे 111 हजार हेक्‍टर होते. त्यापासून सुमारे 1.24 दशलक्ष टन इतके उत्पादन मिळाले होते. भारताच्या फळबागेखालील एकूण क्षेत्रापैकी द्राक्षाचा वाटा 1.74 टक्के असून, एकूण फळ उत्पादनातील वाटा 1.65 टक्के इतका आहे. भारत देश एकूण फळांच्या उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावर असला, तरी द्राक्ष उत्पादनात मात्र नवव्या स्थानावर आहे. 

द्राक्ष क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता - 
भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मिझोराम ही प्रमुख द्राक्ष उत्पादक राज्ये आहेत. यात महाराष्ट्राचे सन 2010-11 मधील द्राक्ष उत्पादन सर्वाधिक म्हणजे 0.77 दशलक्ष टन इतके होते. सन 2008-09 मध्ये भारताचे द्राक्ष उत्पादन 18,78,300 टन इतके उत्पादन झाले होते. त्या वेळेस महाराष्ट्रातून सुमारे 14,15,000 टन इतके, म्हणजे भारताच्या एकूण द्राक्ष उत्पादनाच्या 74.33 टक्के उत्पादन झाले होते. मात्र सन 2009-10 या कालावधीत द्राक्ष उत्पादनात कमी उत्पादकतेमुळे घट झालेली दिसली. या कालावधीत भारताच्या एकूण द्राक्ष उत्पादनाच्या 49.96 टक्के, तर सन 2010-11 मध्ये 62.68 टक्के उत्पादन राज्यात झाले. उत्पादकतेचा विचार करता उत्पादकता सन 2008-09 च्या तुलनेत कमी झालेली आहे. 

द्राक्ष - राज्यनिहाय क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता - 
भारताची राज्यनिहाय द्राक्ष फळपिकाखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता तक्ता 1 मध्ये दिली आहे. 
सन 2010-11 मध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटकाचे द्राक्ष उत्पादन 3,30,300 टन त्या खालोखाल तमिळनाडूचे 53,000 टन, आंध्र प्रदेशचे 27,600 टन, तर मिझोरामचे 20,400 टन इतके होते. भारतातील द्राक्षाचा क्षेत्र व उत्पादनात, महाराष्ट्राचा प्रमुख वाटा आहे. महाराष्ट्राची द्राक्षे भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहेत. द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र व उत्पादनात, देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असला तरी उत्पादकतेत मात्र मागे आहे. 
उत्पादन खर्च - 
द्राक्ष उत्पादनामध्ये साधारणपणे नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर हे जिल्हे आघाडीवर आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादन खर्चाचा अभ्यास केला असता साधारणपणे प्रति हेक्‍टरी रुपये 4,65,000 पर्यंत सरासरी खर्च येत असल्याचे निदर्शनास आले. प्रति क्विंटल उत्पादन खर्चाचा विचार करता रुपये 2,500 इतका सरासरी खर्च येत असल्याचे आढळले. 

एकूण उत्पादन खर्चामध्ये खजुरावरील मजुरी, पीक संरक्षण, सेंद्रिय व रासायनिक खते इत्यादी बाबींवरील खर्च जास्त असल्याचे आढळले. 

राज्यातील द्राक्ष विक्रीचा आढावा - 

सन 2011 मधील राज्यातील प्रमुख बाजारपेठांचा अभ्यास केला असता असे निदर्शनास येते, की द्राक्षास मुंबई व नागपूर बाजारपेठेत डिसेंबर महिन्यात सर्वाधिक किंमत मिळाली तर पुणे व नाशिक बाजारपेठेत एप्रिल महिन्यात सर्वाधिक किंमत मिळाल्याचे दिसून आले. राज्यातील महत्त्वाच्या चारही बाजारपेठांचा विचार करता सर्वाधिक किंमत ही मुंबई बाजारपेठेत (7,652 रुपये प्रति क्विंटल) मिळाली. सर्वांत कमी किंमत ही नागपूर बाजारपेठेत (3,573 रुपये प्रति क्विंटल) मिळाली. राज्याचा विचार करता मुंबई ही द्राक्ष विक्रीच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्र राज्याबाहेरच्या बाजारपेठांचा विचार करता चेन्नई, दिल्ली व कोलकता या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. सन 2011 मध्ये मे महिन्यात सर्वाधिक किंमत (8,584 रुपये प्रति क्विंटल) कोलकता बाजारपेठेत मिळाली. त्या खालोखाल दिल्ली बाजारपेठेत (8,213 रुपये प्रति क्विंटल) आणि चेन्नई बाजारपेठेत (6,223 रुपये प्रति क्विंटल) मिळाली. 

द्राक्ष निर्यातीतील संधी - 
देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षविक्रीस चांगला वाव आहे. भारतीय द्राक्षाची निर्यात प्रामुख्याने नेदरलॅंड, बांगलादेश, इंग्लंड, युनायटेड अरब, रशिया, सौदी अरेबिया, बेल्जियम, थायलंड, स्वीडन, नॉर्वे इत्यादी देशात जास्त प्रमाणात होत आहे. 

निर्यातीच्या अभ्यासावरून असे निदर्शनास येते, की भारतातील द्राक्षांची सर्वाधिक निर्यात ही बांगलादेशात होत आहे; मात्र सर्वाधिक उत्पन्न नेदरलॅंडमधूनच मिळत असल्याचे दिसून येते. त्या खालोखाल इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, रशिया, सौदी अरेबिया, बेल्जियम इ. देशात निर्यात होत आहे. सन 2009-10 च्या तुलनेत सन 2010-11 मधील निर्यातीत घट झालेली आहे. सन 2009-10 मध्ये एकूण निर्यात 1,17,337.50 मे.टन इतकी होती, त्यापासून रु. 43,106.50 लाख इतके उत्पन्न मिळाले होते. मात्र सन 2010-11 मध्ये त्यात घट होऊन 93,609.30 मे.टन इतकी निर्यात झाली. त्यापासून रु. 37,395.40 इतके उत्पन्न मिळाले. 

निर्यातीतील अडचणी - 
* द्राक्ष उत्पादकांना निर्यातीमधील नुकसानीस शासकीय अनुदानाची तरतूद नाही. 
* वाहतूक कालावधीमध्ये मुंबई ते लंडन विमा संरक्षणाची सोय नाही, त्यामुळे नुकसानीची भीती असते. 
* निर्यातीसाठी आवश्‍यक द्राक्ष मण्यांचा 18 मि.मी. आकार प्राप्त करण्यास काही वेळा अडचणी येतात. 
* द्राक्ष निर्यातीसाठी आवश्‍यक शीतगृहांचा वापर फक्त तीन महिने होतो, त्याशिवाय सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे जनरेटरसाठी डिझेलचा खर्च जादा येतो. 
* आयात केलेल्या वेष्टण साहित्याचा वापर करण्याची सक्ती आहे, त्यामुळे परकीय साहित्यावर अवलंबित्व वाढले. 
* अमेरिकन जहाज वाहतूक कंपन्यांकडून जादा सागरी वाहतूक भाड्याची आकारणी होत असल्याने मिळणाऱ्या लाभाच्या प्रमाणात घट होते. 
* देशांतर्गत खराब रस्त्यामुळे द्राक्ष मणी गळणे व तडे जाण्याच्या अडचणी निर्माण झाल्याने योग्य भाव मिळत नाही. 
* द्राक्ष निर्यातीचा परवाना बिगर द्राक्ष उत्पादकांना दिला जात असल्यामुळे चांगल्या प्रतीच्या व रसायनांच्या अवशेषाचे कमी प्रमाणात असणाऱ्या द्राक्षांची निर्यात होत नाही. 
* द्राक्ष निर्यातीस आवश्‍यक युरोगॅप नोंदणीविषयक पद्धत किचकट असल्यामुळे अनेक शेतकरी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहत आहेत. 

द्राक्ष निर्यात वृद्धीसाठी उपाययोजना - 
* निर्यातीसाठी नवीन बाजारपेठांचा शोध घेऊन तेथील किमती, ग्राहकांच्या आवडी, मागणीचा कालावधी आणि प्रत याबाबत माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी.
* निर्यातक्षम योग्य आकाराच्या द्राक्ष उत्पादनासाठी नवीन वाणांची उपलब्धता करून द्यावी. 
* चांगल्या द्राक्षांच्या निर्मितीसाठी निर्यात परवाना फक्त द्राक्ष उत्पादक आणि द्राक्ष संघांना देण्यात यावा. 
* रसायनांच्या अवशेषांचा परिणाम टाळण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, निर्यातीस प्रतिबंध असलेल्या कीडनाशकांच्या उत्पादनावर शासनाने बंदी घालावी. 
* रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जैविक कीडनाशक व रोगनाशक उपाययोजनांविषयी जनजागृती करावी. 
*"अपेडा'ने वेळोवेळी निर्यातीसंदर्भातील बदलत्या निकषांची माहिती उत्पादकांपर्यंत पोचवावी. तसेच उत्पादकांनी "अपेडा'च्या संपर्कात राहावे. 

संपर्क - 02426-243236 
( लेखक कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत) 

1) राज्यनिहाय द्राक्ष फळपिकाखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता (सन 2010-11) 
राज्यक्षेत्र (000 'हे.)उत्पादन (000 'टन)उत्पादकता (टन/ हे.) 
महाराष्ट्र86.00774.009.00 
कर्नाटक18.10330.3018.30 
तमिळनाडू2.7053.0019.30 
आंध्र प्रदेश1.3027.6021.00 
मिझोराम1.6020.4012.90 
इतर1.7029.5017.30 
भारत111.401234.9011.10 
संदर्भ - भारतीय फलोत्पादन सांख्यिकी, 2011 

 2) द्राक्ष पिकाचा सरासरी उत्पादन खर्च (रु./ क्विंटल) 
अ. क्र.खर्चाच्या बाबीखर्च 
1)खर्च "अ'2,82,000.00 
2)खर्च "ब'4,43,000.00 
3)खर्च "क'4,65,000.00 
4)प्रति क्विंटल2,500.00 

 3) भारतीय द्राक्षाची देशनिहाय निर्यात व मूल्य 
अ. क्र.देश2009-102010-11 
निर्यात (टन)निर्यात मूल्य (रु. लाख)निर्यात (टन)निर्यात मूल्य (रु. लाख) 
1)नेदरलॅंड28,821.9016,755.5017,681.5011,798.10 
2)बांगलादेश44,419.205,213.4038,052.005,142.10 
3)इंग्लंड14,308.508,165.707,550.404,743.80 
4)युनायटेड अरब10,053.604,189.109,545.904,511.10 
5)रशिया745.80598.202,368.801,838.10 
6)सौदी अरेबिया3,656.001,537.903,484.301,421.30 
7)बेल्जियम2,859.601,756.901,677.701,373.30 
8)थायलंड875.60741.201451.501335.50 
9)स्वीडन276.70145.20932.30620.90 
10)नॉर्वे799.20600.70665.40564.20 
11)इतर1,052.503,402.8010,199.704,047.10 
एकूण1,17,337.5043,106.5093,609.3037,395.40 
संदर्भ - राष्ट्रीय फलोत्पादन सांख्यिकी अहवाल, 2011
अधिक वाचा

सातबारा उतारा घेण्यासाठी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (महा. लॅण्ड रेव्हेन्यू कोड) अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात.
गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.सातबारा उतारा घेण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे किंवा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणेकडे जाण्याची गरज भासू नये, यासाठी या उताऱ्यांचे संगणकीकरण करून ते ऑनलाइन सातबारा उतारे संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत. याशिवाय पुणे, मुंबई यासारख्या महानगरांमधील काही प्रॉपर्टी कार्ड चेही संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

सातबारा नमुना मिळवण्‍यासाठी खालील संकेतस्‍थळावर क्‍लिक करा व दिलेल्‍या सूचनांप्रमाणे जिल्‍हा, तालुका व गाव निवडा. त्‍यानंतर हवा तो गट नं. टाकल्‍यावर आपल्‍याला ७/१२ मिळेल.
http://mahabhulekh.maharashtra.gov.in/
**** जमिन मोजणी क्षेत्रफळ रुपांतरे ****
 १ हेक्टर = १०००० चौ. मी .
 १ एकर = ४० गुंठे
 १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ. फुट
 १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
 १ आर = १ गुंठा
 १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
 १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येतात  नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते.जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात.
अधिक वाचा

गाव नमुना म्हणजे काय

'गाव नमुना म्हणजे काय व तो कसा मिळवावा?' या प्रश्नाच्या अनुषंगाने खालील माहिती आपणास पुरवीत आहोत-
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (महा. लॅण्ड रेव्हेन्यू कोड) अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात. तलाठी दप्तर नमुना नंबर 1 ते 21 गाव नमुन्यांमध्ये असते. या नोंदवहीस वेगवेगळा अर्थ असतो.
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीची नोंद पाहता येते.
* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.
अधिक वाचा
.........................................................