निर्यातदार व्हा !

फर्म / संस्थेची स्थापना -
कृषिमालाची निर्यात करण्यासाठी आयात-निर्यात परवाना अत्यावश्यक आहे.सदरचा आयात-निर्यात परवाना काढण्यासाठी सर्वप्रथम एखाद्या प्रोप्रायटरी / भागीदारी /प्राईव्हेट लिमिटेड / पब्लिक लिमिटेड / सहकारी संस्था अथवा ट्रस्ट इ. प्रकारच्या संस्थेची संबंधित विभागांकडे नोदणी करावी. राष्ट्रयीकृत / अंकित सहकारी किंवा बहुराष्ट्रीय बँकेमधे संस्थेच्या नावाचे चालू स्वरूपाचे खाते उघडावे लागते. हा परवाना वैयक्तिक नावावरही प्राप्त होऊ शकतो.
आयात - निर्यात परवाना (IEC) –
आयात-निर्यात परवाना मिळण्यासाठी भाग-ए, भाग-डी चे प्रपत्र संपूर्णपणे भरून अर्जदाराच्या स्वाक्षरीने सहसंचालक विदेश व्यापार यांचे पुणे अथवा मुंबई कार्यालयात हस्ते किंवा पोस्टाद्वारे जमा करावे लागते.
सदर अर्जासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात
1. संस्था नोंदणी प्रमाणपत्र -छायाप्रत
2. आयकर विभागाकडून प्राप्त होणारा कायम खाते क्रमांक (परमनंट अकाऊंट नंबर) – छायाप्रत
3. प्रपत्र-बी नमुन्यानुसार बँकेच्या लेटरहेटवरील प्रमाणपत्र
4. पारपत्राला साजेशा आकाराची संस्था प्रमुखाची दोन छायाचित्र. बँकेच्या प्रमाणपत्रावरील छायाचित्रावर बँक अधिकाऱ्याचे साक्षांकन आवश्यक आहे.
5. सहसंचालक विदेश व्यापार यांचे इंग्रजी अदयाक्षराने रू.1000/- चा पुणे / मुंबई देय धनाकर्ष
6. प्रपत्रानुसार घोषणापत्र
7. अ-4 आकाराचे पाकिट व रू.30/- चा पोस्टल स्टॅप
संपूर्णपणे भरलेल्या व स्वाक्षरीत अर्जाची एक प्रत सहसंचालक विदेश व्यापार, पुणे / मुबई यांच्या कार्यालयात हस्ते अथवा पंजीकृत डाकद्वारे सादर करता येतो. सदर अर्जाबाबत विस्तृत माहिती व प्रपत्राचे नमुने वेबसाईटद्वारे प्राप्त करता येतील. (http://dgft.delhi.nic.in/ and download option Form ANF 2 A)
महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या सहसंचालक विदेश व्यापार, यांच्या कार्यालयांचे पत्ते खालीलप्रमाणे.
सहसंचालक विदेश व्यापार,
सी-ब्लॉक, आयकरभवन,
दुसरा मजला, पी.एम.टी. वर्कशॉप जवळ,
स्वारगेट, पुणे
अंतर्भुत जिल्हे- नाशिक ,पुणे, अहमदनगर, जालना, बीड, कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, व सिंधुदूर्ग
सहसंचालक विदेश व्यापार,
नवीन सी.जी.ओ. इमारत,
नवीन मरिन लाईन्स,
चर्चगेट, मुंबई - 400 020
अंतर्भुत जिल्हे- राज्यातील इतर उर्वरित सर्व जिल्हे
आयात निर्यात परवाना प्राप्त झाल्यावर निर्यातवृद्धी परिषदेकडील नोंदणी तथा सहभागी प्रमाणपत्र आवश्यक असते. कृषिमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यातीसाठी अपेडा, नवी दिल्ली यांच
विभागीय कार्यालय अथवा वेबसाईटच्या द्वारे नोंदणी करता येते. तथापि सर्व कागदपत्रे अपेडा यांच्या विभागीय कार्यालयाकडे पाठवावी लागतात.
कृषि और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात बिकास प्राधिकरण
विभागीय कार्यालय-मुंबई
बँकींग कॉम्प्लेक्स बिल्डींग,
चौथा मजला, सेक्टर 19 अ, वाशी,
नवी मुंबई-400 705
आयातदार कसा शोधावा -
विविध माध्यमातून आयातदार शोधता येतो. त्यामधे पुढीलप्रमाणे काही मार्ग उपलब्ध आहेत.
अपेडा
इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड अँग्रीकल्चर
विविध वेबसाईटवरही सदर माहिती उपलब्ध असते. आयातदारांची यादी प्राप्त झाल्यावर आयातदाराशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्या आयातदाराला आपल्याकडे निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या कृषिमालाची, प्रमाणाची, हंगामाची इत्यादी सर्व माहिती ई-मेल अथवा फॅक्सद्वारे पाठवावी. त्याचा प्रतिसाद प्राप्त झाल्यावर इच्छुक आयातदारांसोबत पत्रव्यवहार व दूरध्वनीद्वारे पुढील चर्चा करणे, त्याला आवश्यक असलेल्या मालाचे नमूने पाठविणे इत्यादीबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
बहुतांशी कृषिमालाच्या निर्यातीमध्ये आयातदाराकडून कोणत्याही प्रकारची एल.सी. (लेटर ऑफ क्रेडीट) प्राप्त होत नाही. सदरच्या मालाची आयात ही निश्चित दराने अथवा कन्साईनमेंट (विक्री होईल त्या दराने व्यवहार या तत्वावर) बेसिसवर केली जातेे व मालाची विक्री केल्यानंतर कमिशन आणि इतर अनुषंगिक खर्चाची वजावट करून उर्वरित रक्कम आयातदाराकडून निर्यातदारास पाठविली जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची लहान / मोठी निर्यात करण्यापुर्वी आयातदाराची बाजारातील पत तपासणे आवश्यक असते. जेणेकरून आयातदाराकडून फसवणूकीचे अथवा लुबाडणूकीचे प्रकार होणार नाहीत. आयातदारांची पत तपासण्याचे काम डन अँड ब्रॅडस्ट्रीट यासारख्या खाजगी व एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. यासारख्या शासकीय संस्थांकडून करण्यात येते. संपर्कासाठी वेबसाईट www.ecgc.in तसेच एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. यांचेकडे आपण निर्यात मालाचा विमा उतरू शकतो. काही कारणांमुळे आयातदाराकडून रक्कम प्राप्त न झाल्यास ई.सी.जी.सी. मार्फत दावा दाखल करू शकतो. वैयक्तिक स्वरूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोर्टकचेऱ्या करणे अवघड जाते.
कृषिमालाच्या निर्यातीपूर्वी ज्या आयातदाराला व ज्या देशात कृषिमालाची निर्यात करावयाची आहे त्या देशामध्ये आवश्यक असलेली गुणवत्ता, पॅकींग, दर इत्यादीबाबतची माहिती आयातदाराकडून प्राप्त करून घ्यावी व त्या गुणवत्तेच्याच मालाची निर्यात करण्यात यावी. निर्यातीपूर्वी मालाच्या विक्री दरांबाबतची माहिती प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून निर्यात करण्यात येणाऱ्या मालाच्या विक्री रक्कमेमधून निर्यातीच्या खर्चाच्या रक्कमेची वजावट केल्यास व्यवहारामध्ये होणाऱ्या संभाव्य फायदा / तोट्याची माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर निर्यातीबाबतची सर्व कागदपत्रे तयार करणे, विमानामध्ये जागा आरक्षित करणे, कस्टम क्लिअरन्स करणे यासाठी क्लिअरींग अँड फॉरवर्डींग एजन्टची (सी.एच.ए.) आवश्यकता असते. अशा प्रकारचे एजन्ट्स मुंबई / पुण्यामधे उपलब्ध असतात. सदरच्या कामासाठी चांगल्या सी.एच.ए. ची नियुक्ती करणे आवश्यक असते. वेगवेगळ्या सी.एच.ए.चे पत्ते महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून उपलब्ध होऊ शकतात.विमानमार्गे निर्यातीबरोबरच कृषिमालाची समुद्रमार्गेसुद्धा निर्यात केली जाते. डाळिंब, आंबा, द्राक्षे, यासारख्या नाशवंत उत्पादनांची जवळच्या देशांमध्ये निर्यात करावयाची असल्यास 40 फूटी अथवा 20 फूटी कंटेनरचा वापर करण्यात येतो. लांबच्या देशांमधे नाशवंत कृषिमालाची निर्यात करावयाची झाल्यास वाहतुकीचा कालावधी जास्त असल्याने त्यासाठी रिफर / सी. ए. / एम.ए. (कंट्रोल्ड / मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर) कंटेनरचा वापर करण्यात येतो. तांदूळ, इंजिनिअरींग उत्पादने अशा प्रकारच्या अनाशवंत मालाची निर्यात ड्राय कंटेनरद्वारे करण्यात येते. त्याचबरोबर विविध उत्पादनांसाठी आवश्यकतेनुसार कंटेनर उपलब्ध होऊ शकतात.
आयातदाराकडून मालाची विक्री रक्कम परकीय चलनामधे आपल्या बँकेमधे जमा करण्यात येते. सदर परकीय चलनाचे रूपयामधे रूपांतर होऊन त्यानंतर सदरची रक्कम निर्यातदाराच्या खात्यामधे जमा करण्यात येते. विक्रीची रक्कम लवकरात लवकर प्राप्त होण्याच्या दृष्टीने बँकेच्या ज्या शाखेमधे परकीय चलन विनिमयाचे व्यवहार केले जातात अशा बँकेतच खाते उघडणे आवश्यक व सोईस्कर असते. आयातदाराकडून काही कारणांमुळे रक्कम प्राप्त होण्यात अडचणी येत असल्यास ई.सी.जी.सी. अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एजन्सीची मदत घेता येते.
सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ                               संकलन : दत्तात्रय व्ही.आवारे

अधिक वाचा
.........................................................