द्राक्ष फळपीक हे मख्यत: शीत कटीबंधातील असून रशियामधील कॅसपियन समुद्राजवळील अरमेबिया हे मुळ गाव आहे. तेथून युरोप, इराण व अफगणीस्थान येथे प्रसार झाला. भारतामध्ये १३०० ऐ.डी.मध्ये इराण आणि अफगणीस्थानाद्वारे द्राक्षाचा प्रसार झाला.द्राक्षाच्या जगभरामध्ये १०,००० जाती विविध देशात विविध हवामानात घेतात. भारतामध्ये १००० द्राक्षाच्या जाती संग्रही आहे. तथापी काही मोजक्याच जातींचा खाण्यासाठी, बेदानेसाठी, रस व वाईन यासाठी लागवड केली जाते. यामध्ये ७७ ते ८० % द्राक्ष त्यामध्ये २ % निर्यात केली जाते. बेदाणेसाठी १७ ते २० % रसासाठी १.५ % आणि वाईनसाठी ०.५ % द्राक्षाच्या जातीची लागवड केली जाते.व्यापारी दृष्टया महत्वाच्या जातींच्या माहिती खाली नमूद केली आहे.
१. खाण्याची(टेबल ग्रेप्स) द्राक्ष
अ. पांढ-या जाती: थॉमसन, सिडलेस, तास-अ-गणेश, सोनाका, माणिक चमन, सुपेरीअर सिडलेस.
ब. रंगीत जाती: शरद सिडलेस, फ्लेम सिडलेस, क्रीमसन सिडलेस,फ़ॅन्टसी सिडलेस, रेडग्लोब इ.
२. बेदाणेच्या जाती: थॉमसन सिडलेस, तास-अ-गणेश, सोनाका व अर्कावती
३. रसाच्या जाती: बंगलोर पर्पल, पुसा नवरंग
४. ग्रेपवाईच्या जाती
अ. रंगीत जाती: कॅबेरणेट सोव्हीनीओ, कॅबेरने क्रक,मर्लो, पिनॉट नॉयर, खिराज.
ब. व्हाईट जाती: शर्डोंन्ही,शेनीन ब्लॉक, सोव्हिनॉन ब्लॉक.
या लेखामध्ये टेबल ग्रेप्स तथा खाण्याची द्राक्षाच्या जातीची सखोल माहिती दिली आहे.
१. थॉमसन सिडलेस
या जातीचे उगमस्थान हे आशिया खंडातील आहे. कॅलिफोर्नीयाजवळील युबा शहराजवळ विल्यम थॉमसन यांनी या जातीचा प्रथम लागवड केली. म्हणून थॉमसन सिडलेस या नावाने ती प्रचलीत झाली आहे. ही जात भूमध्यसागरच्या पूर्व भागात ओव्हन किशमिश तर ऑस्ट्रेलिया व दक्षिण अफ्रिकेत सुलतान या नावाने ओळखली जाते. या जातीची लागवड जगामध्ये बहुतेक द्राक्ष पिकवणार्या देशांमध्ये करतात. ही एकमेव बहुउद्देशीय जात आहे.जगामधील ५० % पेक्षा जास्त बेदाणे निर्मिती याच जातीपासून केली जाते. कॅलिफोर्नीयामध्ये ९५ % बियाणे थॉमसन सिडलेस याच जातीपासून करतात. तसेच बेदाणे, खाण्यासाठी प्रामुख्याने या जातीचा उपयोग करतात.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि म्हैसूर या राज्यात या जातीचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे. अलिकडच्या काळामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष व जमिनीतील क्षारतेचे प्रमाण वाढल्यामुळे बहुतेक ठिकाणी थॉमसन सिडलेसची लागवड डॉगरीज खुंटावर करतात. वेलीची वाढ जोमदार असून मालकडीवर ६ ते १० डोळ्यामध्ये घड निर्मिती होत असते. घडाचा आकार, मध्यम, त्रिकोणी, लांबट, पूर्ण भरलेला असतो. मणी हिरवे पिवळसर रंगाचे असतात. आकार लांब गोल, गर घट्ट असून पारदर्शक असतो. चव आंबट गोड, रसाचा रंग हिरवट पांढरा, प्रत अतिशय चांगली असते. मण्यातील विद्राव्य घटकाचे प्रमाण १८ ते २२ % तर आम्लता ०.४६ ते ०.६० % असते. मण्यातील रसाचे प्रमाण ८० टक्यापर्यंत असते. मण्याची उत्तमवाढ जीए, ६ बीए, सिपीपीयू व ब्रॉंसिनो स्टरोईडसला योग्य प्रतिसाद देते. प्रतिकुल हवामान केवडा, भुरी, करपा , अणुजीवजन्य करपा रोगास सहज बळी पडते. परंतु योग्यबागेचे व्यवस्थापन असलेल्या बागेमधून एकरी १० ते १२ मे.टन उत्पादन मिळते.
२. तास-अ -गणेश
थॉमसन सिडलेस या जातीपासून बड स्पोर्टद्वारे तास-अ-गणेश या जातीची निर्मिती झाली. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये बोरगाव येथील श्री. सुभाष आर्वे यांच्या ते निदर्शनास आले. थॉमसन व तास-अ-गणेश यांचे सर्व गुणधर्म जवळजवळ सारखेच आहेत. परंतु तास-अ-गणेश या जातीची शेंड्याकडील कोवळी फुट लालसर तांबूस रंगाची असते. याची लांबट गोल, दंडगोल हिरवट पिवळा, पारदर्शक व जाड साल असते. दूरवरच्या बाजारपेठेसाठी उत्तम व टिकाऊ आहे.
३. सोनाका
थॉमसन सिडलेस जातीपासून बड स्पोर्टद्वारे विकसित झाली आहे. १९७७ साली सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील नानासाहेब काळे यांच्या हे निदर्शनास आले आहे. या जातीच्या वाढीचे गुणधर्म थॉमसन सिडलेस या जातीसारखेच आहे. फरक हा मण्यांमध्ये आहे. मणी दंडगोलाकार, लांबी ३० मी.मी व १४ ते १५ मि.मी. व्यासाचे असतात. परिपक्व मणी सोनेरी पिवळसर दिसतात. मण्यांमध्ये विद्राव्य घटकांचे प्रमाण २२ ते २४ % तर आम्लतेचे प्रमाण ०.५० ते ०.५५ % असते.
४. माणिक चमन
ही जात थॉमसन सिडलेसची प्रजात असून १९८२ साली सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील श्री.टी.आर. दाभाडे यांनी ही जात बड स्पोर्ट द्वारे विकसित केली आहे. वाढीचे गुणधर्म थॉमसन सिडलेस या जातीसारखेच आहे. व जी.ए. शिवाय या जातीचे मणी लांबट होतात.
रंगीत जाती
१. किशमिश चोरणी
किशमिश चोरणी ही जात युनायटेड सोव्हिएट रशिया या देशामध्ये विकसित झाली असून अबग्निस्थान मध्ये या जातीस चांगली मागणी असून बाजारभावही चांगला मिळतो. वेलीची वाढ मध्यम आहे.घड मध्यम आकाराचे, त्रिकोणी, एकसारखी मण्याची ठेवण असते. मण्याचे आकार लांबट गोल, लांबी १६ ते १९ मि.मी. व्यास १४ ते १६ मि.मी., वजन २.५ ते ३.० ग्रम असून रंग तांबूस काळसर आहे. मण्यांमध्ये एकूण विद्रव्य घटकाचे प्रमाण २० ते २२ % व आम्लता ०.५ % ते ०.७५ %आहे. उत्पन्न ८ ते १० मे. टन प्रती एकरी मिळते.
२. शरद सिडलेस
किशमिश चोरणी या जातीपासून नैसर्गिक बड स्पोर्ट द्वारे,सोलापूर नान्नज येथील नानासाहेब काळे यांनी ही जात विकसित केली आहे. घडाचा आकार मोठा, त्रिकोणी,आकर्षण, एकसारखी मण्याची ठेवण, मणी लांबट गोल, रंग काळसर तांबूस, भरपूर नैसर्गिक लव, वजन ३ते ३.५ ग्रम लांबी १६ ते १९ मि.मी व व्यास १४ ते १६ मि.मी.असतो.मण्यातील विद्राव्य घटकाचे प्रमाण २२ ते २४ % व आम्लता ०.५ ते ०.७ % इतकी असते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये ह्या जातीची लागवड मोठया प्रमाणावर वाढली आहे.
३. फ्लेम सिडलेस
कॅलिफोर्निया येथील फ्रेन्सो येथे अमेरिकेच्या कृषी विभागाद्वारे ही जात विकसित केली आहे. वेलीची वाढ मध्येम असून या जातीमध्ये सूक्ष्म घडाची निर्मिती ५ ते ७ व्या डोळ्यापर्यंत होते. घडाचा आकार मोठा असून त्रिकोणी निमुळता असतो.घडामध्ये मण्यांची ठेवण आकर्षक असते. मण्याचा रंग फिकट गुलाबी आणि आकर्षक असतो व जास्त पक्क झाल्यावर गडद गुलाबी रंगाचे मणी दिसतात. मण्यांमध्ये एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण १८ ते २१ % आम्लाता ०.६५ ते ०.७५ % असते. उत्पादन ९ ते १० मे. टन प्रती एकरी मिळते.
४.रेड ग्लोब
या जातीची निर्मिती रेड एम्परर या जातीच्या मुक्त परागीभवन द्वारे निवड पध्दतीने कॅलीफोर्निया विद्यापिठात विकसित केली आहे. वेलीची वाढ जोमदार असते व घडाचा आकार मोठा व आकर्षक असतो. मालकड्यांवर ४ ते ७ व्या डोळ्यामध्ये सूक्ष्म घड निर्मिती होते. या जातीचे मणी फिकट तांबडे-गुलाबी रंगाचे असून मण्यांमध्ये २ ते ३ बिया असतात. मण्यांचा आकार गोल, आकर्षक, पातळ लव,स्वच्छ रस असतो.१२० ते १३० दिवसांत तयार होते. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण १६ ते १८ %, आम्लता ०.५ ते ०.६% व रसाचे प्रमाण ६५ ते ७० % असते. हा माल दूरवरच्या बाजारपेठेसाठी अधिक काळ टिकवता येतो.