या वर्षी सर्वाधिक गुणवतेची द्राक्ष

द्राक्ष निर्यात नोंदणीत दोन हजार हेक्‍टरने वाढ मागील दोन वर्षे "फयान' वादळ व अवकाळी पावसाशी सामना केलेल्या द्राक्ष उत्पादकांना यंदा मात्र वातावरणाने साथ दिली आहे. या परिस्थितीत वेलीवरील द्राक्षघडास चांगली गुणवत्ता दिसत असताना निर्यातीसाठी उत्साह वाढला आहे. गतवर्षी राज्यभरातून 15 हजार बागांमधून 12 हजार हेक्‍टर द्राक्ष क्षेत्राची नोंदणी झाली होती. यंदा त्यात तब्बल दोन हजार हेक्‍टरने वाढ झाली आहे. नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद या विभागातून कृषी विभागाने दिलेल्या मुदतीअखेर 17 हजार बागांमधून 14 हजार हेक्‍टर क्षेत्राची निर्यातीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. 
नाशिकला सर्वाधिक वाढ
राज्यातील द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांपैकी सर्वाधिक 55 हजार हेक्‍टर क्षेत्र नाशिक जिल्ह्यात आहे. गतवर्षी नाशिकला 10 हजार 666 बागांची निर्यात नोंदणी झाली होती, ती यंदा 15 हजार 499 बागांची झाली आहे, तर द्राक्ष क्षेत्रात एका वर्षात 7500 वरून दहा हजार हेक्‍टरवर नोंदणी यंदा झाली आहे. बागांच्या संख्येत पाच हजाराने व क्षेत्र संख्येत अडीच हजार हेक्‍टरने वाढ झाली आहे. नोंदणीत वाढ झाली असली, तरी देशाबाहेरील बाजारपेठेत मागणी कशी राहील यावर द्राक्ष निर्यातीचे भवितव्य अवलंबून आहे.
कमी पाऊस ठरला इष्टापत्ती
कृषी अधिकारी गोविंद हांडे म्हणाले, ""ऑक्‍टोबर छाटणीनंतर विशेषतः फुलोऱ्याच्या काळात प्रतिकूल वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका आतापर्यंत बसला आहे. यंदाही पाण्याची टंचाई सर्व विभागांत आहे. मात्र, सुरवातीच्या टप्प्यात पोषक वातावरण लाभल्याने राज्यातील सर्वच द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांत चांगला बहर आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कमी खर्चात गुणवत्ता साधली असल्यामुळे निर्यातीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सर्वच भागांत भरपूर उत्पादन असल्याची माहिती येत आहे. बाजाराचे चित्र येत्या पंधरवड्यात स्पष्ट होणार असले तरी द्राक्ष उत्पादकांनी गुणवत्ता व रोख व्यवहार या गोष्टीवर भर देणे आवश्‍यक आहे.''
"बंपर' उत्पादनाची स्थिती नाही
द्राक्ष शिवारातील परिस्थिती चांगली असून, द्राक्ष उत्पादकांनी आगाप ऑगस्टपासून ते उशिरात उशिरा नोव्हेंबरअखेरपर्यंत छाटण्या घेतल्या आहेत, त्यामुळे टप्प्याटप्प्यानेच बाजारात माल येणार आहे, त्यामुळे एकदम बाजारात माल वाढून बाजारावर दाब येईल अशी स्थिती नाही. वातावरणाने साथ दिल्याने, तसेच बागेत चांगले व्यवस्थापन केल्यामुळे बहुतांश द्राक्ष उत्पादकांनी गुणवत्तेचा माल बनविला आहे, त्यामुळे या काळात दरात फार उतरण होण्याची शक्‍यता दिसत नाही.
पक्वतेनंतरच खुडणी करा
द्राक्षमालाची गोड चव, चांगला गर व पुरेशा पक्वतेनंतर उतरलेली फळांतील साखर या निकषांवर उतरलेल्या द्राक्षांना बाजारात मोठी मागणी राहतेच, त्यामुळे बाजारात चांगले दर असले तरी माल पक्वतेपूर्वी खुडण्याची घाई द्राक्ष उत्पादकांनी करू नये. अशा अपक्व व आंबट चवीच्या हिरवट मालामुळे ग्राहकांकडून द्राक्षाला मागणी होत नाही व त्याचा फटका चांगल्या गुणवत्तेच्या मालाला बसतो, ही काळजी शेतकऱ्यांनी घेणे आवश्‍यक राहणार आहे.
व्यवहार रोखच हवा!
सुरवातीच्या टप्प्यात बाजार तेजीवर असताना प्रामुख्याने कोलकता येथे माल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादकांची फसवणूक केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. सुरवातीची काही वर्षे पॅकिंग मजूर म्हणून काम करणारेच पुढे व्यापाराचा अभ्यास करून दलाल बनतात. पुढे शेतकऱ्यांचा माल गोळा करून अचानक पैसे न देता पलायन करतात, असे अनेक प्रकार समोर आले आहेत. याबाबतीत द्राक्ष उत्पादकांनी सुरवातीपासूनच सावधगिरी बाळगणे आवश्‍यक असल्याचे श्री. हांडे यांनी सांगितले.
अधिक वाचा
.........................................................