नवीन द्राक्ष बागेची लागवड

नगदी पीक म्हणून द्राक्ष लागवड करून भरपूर उत्पादन घेण्याची प्रत्येक शेतक-याची अपेक्षा असते. हे पीक बहुवर्षीय असून, एकदा लागवड झाल्यानंतरपिकाचे आयुष्यमान १२-१४ वर्ष असते. तेव्हा लागवडी संदर्भातील प्रत्येक गोष्टी बारकाईने पाहून निर्णय घेणे फारच. महत्वाचे ठरते.
  द्राक्ष पीक हे देशातील सर्वात महत्वाचे फळपीक मानले जाते. राज्यात प्रामुख्याने नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत द्राक्ष लागवड होते. या फळपिकाच्या वाढीकरिता, तसेच उत्पादनास पोषक असे वातावरण या विभागात आढळते. बहुवर्षीय पीक असल्याने त्याच्या लागवडीसंबंधी सर्व बाबींची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे.
आवश्यक घटक
तापमान : द्राक्षाची शाकीय वाढ व्यवस्थित होण्याकरिता उष्ण व कोरडे वातावरण या बागेत असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे फळांच्या वाढीकरिता सुद्धा अशाच वातावरणाची गरज असते. घडाच्या पक्वतेच्या काळात असलेला पाऊस घड चिरण्याची समस्या निर्माण करतो. वेलीला वाढीच्या काळामध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यास फळधारणेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते. त्याचप्रमाणे फळछाटणीनंतर तापमान १५ अंश से.पेक्षा कमी असल्यास डोळे फुटण्यामध्ये अडथळे येतात.
पाऊस : अधिक पावसाच्या वातावरणात द्राक्ष बाग लागवड हानिकारक ठरू शकते, कारण घडनिर्मिती होण्याकरिता कोरडे वातावरण गरजेचे असते; परंतु याच कालावधीत पाऊस सुरु असल्यास घडनिर्मिती विपरीत परिणाम होऊन उत्पादनाचे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे फळ छाटणीनंतर फुलोरा अवस्थेत पाऊस असल्यास निरनिराळ्या रोगांचा प्रादुर्भाव त्या वेलीवर होऊन उत्पादन पूर्णपणे घटते.
माती : द्राक्ष बाग जरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये शक्य होत असली, तरी हलकी व मध्यम प्रतीची
जमीन, जिथे पाण्याचा निचरा चांगला होतो. अशा प्रकारच्या जमिनीत वेलीला वाढ चांगली होते. फळांची प्रतसुद्धा या जमिनीत चांगली अनुभवास येते. याकरिताच जमिनीचे भौतिक गुणधर्म उदा. मातीचा पोत, मातीची रचना, मातीची खोल व पाणी धरून ठेवण्याची क्षमता व त्याचप्रमाणे मातीचा सामू(PH) व क्षारता इत्यादी घटकांचा व द्राक्षवेल लागवड करताना विचार करणे गरजेचे असते. पोत म्हणजे त्या जमिनीत असलेले वाळू व मातीच्या कणांचे प्रमाण यावरून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता लक्षात येते. जास्त असलेले मातीचे कण ही पाणी जास्त काळ धरून ठेवते; परंतु जर त्याच जमिनीत वाळूचे प्रमाण जास्त असल्यास मुळातील क्षेत्राच्या खाली वेलीला दिलेले पाणी व अन्नद्रव्य वाहून जातात त्यामूळे मातीचा पोत लक्षात घेणे फार गरजेचे होते. जमिनीची खोली ही सुध्दा मुळाचा विस्तार व वाढ यावर परिणाम होतो. खुंटाची मुळे जास्त खोलवर पसरत असल्याने कोणत्याही प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते. स्वमूळावरील वेलीची मुळे एक ते दीड फुटापर्यंत खोलवर जाऊ शकतात; परंतु खुंटावरील मुळे चार ते पाच फुट खोलीवर जातात, त्यामुळेच जमिनीचे महत्व लागवडीमध्ये गरजेचे असते.
द्राक्ष जातींची निवड :हिरव्या द्राक्षांमध्ये थॉमसन सीडलेस, तास-ए -गणेश, सोनाका, माणिक चमन, इ. जाती फायदेशीर ठरतात, तर रंगीत जातीमध्ये शरद सीडलेस, प्लेम सीडलेस व रेड ग्लोबसारख्या द्राक्ष जातीचा समावेश आहे. यासोबतच वाइन करण्याकरिता अलीकडे प्रक्रिया केंद्राची उभारणी मोठया प्रमाणावर चालू आहे. याकरिता शेनीनब्लॅक  कॅबरनेट, सॅव्हिग्नोन,शिराज इ. जातींचा समावेश आहे.
लागवड :
  द्राक्ष लागवड करताना कालावधी महत्वाचा असतो. खुंटावरील कलम केल्यानंतर त्या रोपांची मुळे जमिनीत पसरून त्याचा विकास होऊन कलम करण्याकरिता सात ते आठ मि.मी जाडीची काडी घेणे गरजेचे असते. याकरिता जवळपास सहा-सात महिने कालावधी निघून जातो तेव्हा लागवड ही साधरणता: जाने-फेब्रुवारी महिन्यांत करणे गरजेचे होते. जमिनीची प्रकार यावर लागवडीचे अंतर अवलंबून असते. हलक्या जमिनीत ९ 'स '५ तर भारी जमिनीत ९ 'स६' पुरेसे होते.
जमिनीची पूर्वतयारी : 
  द्राक्ष हे पीक इतर पिकांपेक्षा नाजूक असते. द्रक्षवेलीला पाण्याचा पुरवठा करण्याकरिता वेलीच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेत वेगवेगळ्या मात्रेची पाण्याची गरज असते, म्हणूनच या पिकाला पाणी हे ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक वेलीस लिटरच्या मापाने द्यावे लागते. प्रत्येक वेलीस सारख्या मात्रेने पाणी मिळण्याकरिता सारखा दाब असणे आवश्यक असते. तेव्हा लागवडीपूर्वी जमीन सपाट करून घेतल्यास हे शक्य करून घेता येते. द्राक्ष पिकाला पाण्यासोबत खतांचीसुद्धा गरज असते. प्रत्येक वेलीला दिलेल्या प्रत्येक ग्रम खतांचा वापर होऊन, त्यापासून चांगल्या प्रतीचे उत्पादन अपेक्षित असते; तेव्हा वेलीला दिले गेलेले खत फक्त वेलीच्या मुळाणेच उचलून घेतल्यास हे शक्य होते. शेतामध्ये बहुवर्षीय गवत उदा: लव्हाळ, हरळीचा व इतर तणांचा सुरुवातीलाच नायनाट करावा.
लागवडीकरिता निवडलेले क्षेत्र
  द्राक्ष पिकाच्या वाढीवर वातावरणाचा फारच मोठा प्रभाव असतो,कोरडे वातावरण फारच गरजेचे असते. हलकी ते मध्यम प्रतीची जमीन, पाण्याचा चांगला निचरा होणे, इ. गोष्टी फारच हितकारक समजल्या जातात; कारण असे वातावरण मिळाल्यास व्यवस्थापनाच खर्च कमी होतो. द्राक्षवेलीवर रोग व किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. रोगांपैकी केवडा, करपा भुरी तर किडी करीता खोड व लालकोळी  हे रोग फार हानिकारक आहेत. ज्या वातावरणात आद्रता जास्त असते तिथे डाउनी मिल्डयू (केवडा) सारख्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. तसेच शेजारच्या बागेत जर आर्द्रता निर्माण करणारे पीक असेल (उदा: ऊस) तर या रोगाचा प्रादूर्भाव जास्त होतो. ज्या वातावरणात सतत पाऊस असतो, अशा ठिकाणी करपा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो; तेव्हा लागवडीकरीता शक्यतोवर अशा प्रकारचे वातावरण टाळावे.
लागवडीची दिशा आखणी व चर घेणे : 
  लावडीची दिशा ठरवणे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. इतर पिकांमध्ये ही परिस्थिती नसते. निर्यातक्षम प्रतीची द्राक्ष तयार करण्याकरिता घड एकसारख्या हिरव्या रंगाचा आवश्यक असतो. द्राक्षवेलीची कॅनॉपी जरी कमी-जास्त असली तरी दुपारपर्यंतचा सूर्यप्रकाश व दुपारनंतर वेलीच्या विशिष्ट भागांवर मिळणारा सूर्यप्रकाश एकसारख्या हिरव्या रंगाचे द्राक्ष घड ठेवण्याकरिता महत्वाचा ठरतो. घड सावलीत राहण्याकरिता वेलीच्या ओलांड्यांची दिशा ही उत्तर-दक्षिण असणे गरजेचे असते, तेव्हा लागवडीची दिश सुद्धा उत्तर-दक्षिण राहील याची काळजी घ्यावी. या दिशेने लागवड केल्यास वाय किंवा 'टी' प्रकारची वळण पद्धत उपयोगाची ठरते कारण यामध्ये कॅनॉपी ही व्हरटीकल अशी असते. तर याच तुलनेत पसरट अशी कॅनॉपी ज्या वळण पद्धतीमध्ये असते, तिथे ही लागवडीची दिशा महत्वाची नसते उदा: मांडव पद्धत.या पद्धतीमध्ये पसरट अशी कॅनोपी असते पत्येक घड हा कॅनोपीच्या खाली असतो, त्यामुळे यापद्धतीत लागवडीची दिशा पूर्व-पश्चिम असावी.
  लागवड करण्यापूर्वी आखणी करून घेणे फार गरजेचे असते. दोन वेलींतील अंतर ठरवून आखणी करून घ्यावी .हलक्या ते मुरूम असलेल्या जमिनीत टेबल ग्रेप्स  करीता आठ ते नऊ फुट अंतर ठेवता येते. कारण या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे कॅनॉपी पाहिजे तशी वाढत नाही, त्यामुळे वरील अंतर पुरेसे होऊ शकते. भारी जमिनीत वाढीचा जोम जास्त असल्यामुळे दहा फुट अंतर गरजेचे असते. यापेक्षा अंतर कमी केल्यास बागेत सूक्ष्म वातावरण वाढेल व रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असेल तेव्हा जमिनीच्या पोतानुसार अंतर ठरवावे. याच तुलनेत वाईनग्रेप्सचा विचार केल्यास मुळातच या वेलीची वाढ कमी असते, तसेच उत्पादनसुद्धा टेबल ग्रेप्सच्या तुलनेत फारच कमी घेतले जाते, घड सावलीत असावेत असे नाही, त्या मुळे वाईन ग्रेप्सच्या लागवडी करिता दोन वेलीतील अंतर सात ते आठ फुट पुरेसे होते.द्राक्ष लागवडी करिता जमिनीचा पोत व पाण्याची प्रत फार महत्वाची असते. आपल्या भागात प्रत्येक ठिकाणी पाण्यात क्षार व जमिनीत चूनखडी आढळून येते. अशा वेळी द्राक्ष लागवड ही खुंटाचा वापर करूनच करण्याची शिफारस केली जाते. खुंटरोपाची मुळे ही फार खोलवर (जवळपास पाच-सहा फुट) जातात, त्यामुळे जमिनीत मुळाचा विस्तार चांगला होण्याकरिता जमिनीतील वातावरण चांगले असणे गरजेचे असते, तेव्हा लागवडीपूर्वी चारी घेणे फारच गरजेचे आहे, मशीनच्या साह्याने दोन फुट रुंद व दोन फुट खोल अशी चारी घ्यावी.चारी घेतांना वरच्या एक फुट थरावरची माती एका बाजूला ठेवावी व खालच्या दुस-या एक फुटाची माती दुस-या बाजूला टाकावी.चारी भरतेवेळी वरची माती तळावर टाकून त्यावर शेणखत,काडीकचरा ,पाचट,कंपोस्ट इ.गोष्टी टाकाव्यात,तसेच त्यावर सुपरफॉस्फेट टाकून खालची आजपर्यत उपयोगात न आलेली माती टाकून चारी झाकून घ्यावी.खडकाळ किंवा मुरूम असलेल्या जमिनीत रीपिंग करणे फारच गरजेचे आहे.चार-पाच फुट लांब अशी मशीनची सोंड  जमिनीत आतपर्यंत जाऊन पोकळी निर्माण करते,त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व त्याचा चांगला फायदा होतो.

4 आपली प्रतिक्रिया » :

Unknown म्हणाले...

http://www.nashikgrapes.in/

Unknown म्हणाले...

Navin grapting kelele aahe manikchaman tyavhe niyojan kase karave

Unknown म्हणाले...

द्राक्ष बाग रीकट केला १९ तारखेला तर माहिती हवी


Unknown म्हणाले...

छाटणी केल्यानंतर ग्राफटींग किती दिवसांनी करावी आणि का

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................