द्राक्ष लागवड तंत्रज्ञान

  भारतात द्राक्ष लागवडीसाठी असणा-या एकूण क्षेत्राच्या निम्यापेक्षा जास्त क्षेत्र हे एकटया महाराष्ट्रातच असल्याने द्राक्ष शेतीस महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत विशिष्ट असे स्थान प्राप्त झालेले आहे. यशस्वी द्राक्ष उत्पादन हे एका विशिष्ट व उच्च तंत्रावर अवलंबून आहे. दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्षाची प्रत ही फार उच्च दर्जाची असावी लागते. अशा द्राक्षाचे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बंधूनी त्याच्या शेतावर आवलंबला तर अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या द्राक्षाची मागणी वाढून निर्यात वाढेल.
हवामान व जमीन 
  उष्ण व कोरडया हवामानामध्ये द्राक्षवेलीची वाढ चांगली होऊन चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते. द्राक्षाची वाढ कमी पावसाच्या प्रदेशात आणि उष्ण व कोरडे हवामान, असलेल्या प्रदेशात चांगली होते. सरासरी कमाल हवामान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आणि किमान सरासरी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जात नाही. अशा ठिकाणी द्राक्षाची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते. 
  द्राक्ष पिकाला मध्यम काळी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन चांगली असते. तरीपण द्राक्षाचे पीक निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. द्राक्षाची मुळे जमिनीच्या ६० सें.मी. खोलीच्या थरात पसरतात. मातीचा वरचा ६० सें.मी. थर व त्याखाली ठिसूळ मुरूम असल्यास अशा जमिनीत द्राक्षे चांगली येतात. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
अभिवृध्दी व लागवड पद्धती 
  द्राक्षाची लागवड छाट कलमापासून केली जाते. जोमदार, निरोगी आणि अधिक उत्पन्न देणा-या वेलीपासून विशिष्ट जातीची छाट कलमे करावीत. १५ ते २० सें.मी. लांबीची छाट कलमे करावीत. द्राक्षबागेची लागवड दोन पध्दतींनी करतात.एक म्हणजे छाट कलमे कायमच्या जागी ऑक्टोबर महिन्यात लावून आणि रोप वाटिकेत छाट कलमांना मुळ्या फुटल्यानंतर जानेवारी महिन्यात रोपवाटिकेत काढून बागेत लागवड करतात. अलीकडे, द्राक्षात खुंट वापरून इच्छित जातींची कलमे करून लागवड करण्यात येत आहे. सूत्रकृमी, चुनखडी तसेच पाण्याचा ताण यावर मात करण्यासाठी खुंट वापरून यश मिळवता येते. बंगलोर डॉगरीज, रामसे १६१३ इ.जाती खुंट म्हणून वापरतात.
पूर्वमशागत 
  सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापूर्वी ६० सें.मी बाय  ६० सें.मी खोली व रुंदीचे दक्षिण उत्तर चर घ्यावेत. हे चर चांगली माती व खतांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. खतमातीच्या मिश्रणात हेक्टरी २० किलो या प्रमाणात १० % कार्बारील भुकटी मिसळावीत. चराच्या तळाला झाडाच्या ठिकाणी २ ते २.५ किलो सुपर फॉस्फेट व २० ते २५ किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.
सुधारित जाती  
  महाराष्ट्रात थॉमसन सिडलेस, तास ए.गणेश, सोनाका सिडलेस, माणिक चमन, शरद सिडलेस, फ्लेम सिडलेस, अनाबेशाही, बंगलोर पर्पल या जातींची लागवड केली जाते. त्यापैकी अलीकडच्या काळात थॉमसन सिडलेस, तास ए गणेश व सोनाका या जातींची सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते.
  द्राक्षाच्या बिनबियांच्या जातीमध्ये थॉमसन सिडलेस ही उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन देणारी जात आहे.या जातीचे उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन असून घड मध्यम,भरगच्च मण्यांनी भरलेला असतो. साखरेचे प्रमाण २० ते २२% असल्यामुळे बेदाणे करण्यास या जातीचा वापर मोठया प्रमाणावर केला जातो.
अनाबेशाही ही जात आंध्रप्रदेशात हैदराबाद सभोतालच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर लावली जाते.या जातीचे हेक्टरी उत्पादन २० ते २५ टनापर्यंत असून घडांचा आकार मध्यम, मणी मोठे व फिक्कट पिवळसर रंगाचे असतात यात साखरेचे प्रमाण १५ ते १६% असते.
  तास-ए-गणेश ही जात थॉमसन सिडलेस या जाती पासून निवड पध्दतीने सांगली जिल्हयातील तासगाव येथे शोधून काढण्यात आली. सोनाका ही जात नानज, जिल्हा सोलापूर येथे थॉमसन सिडलेस या जाती मधून निवड पध्दतीने शोधून काढण्यात आले या जातीत साखरेचे प्रमाण २४ ते २६% असल्याने बेदाणे तयार करण्यास ही जात चांगली आहे.
लागवड पध्दत
  ऑक्टोबर महिन्यात लावलेली छाट कलमे जानेवारी पर्यंत शेतात लावणीसाठी तयार होतात. चांगल्या मुळ्या फुटलेली छाट कलमे थोडी पाने काढून आणि कोवळा शेंडा खुडून मुळांना इजा होऊ न देता मातीच्या हुंडीसह काढून कायमच्या जागी लावाव्यात.
खते 
  द्राक्षवेलींना लागणा-या सर्व आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा हा वेलीची वाढ, उत्पादन गुणवत्ता यावर अवलंबून असतो. म्हणून एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीचा काळ हा खते देण्याच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. यासाठी रासायनिक खते आणि सेंद्रीय खते यांचा समतोल वापर करावा लागतो. रासायनिक खते देतांना जमिनीमध्ये सेंद्रीय खतांची मात्रा योग्य मुळाच्या वाढीकरिता स्फुरदाची अवश्यकता असते. म्हणून द्राक्षाच्या लागवडीपूर्वी चरातून किंवा खड्ड्यातून स्फुरदयुक्त खते देणे आवश्यक आहे. द्राक्षांच्या काड्या लावल्यापासून पीक येईपर्यंतच्या काळात खते देणे आवश्यक आहे द्राक्षासाठी प्रति हेक्टरी ९०० कि. नत्र, ५०० कि. स्फुरद व ७०० कि. पालाश ऑक्टोबर व एप्रिल छाटनीला मिळून द्यावे त्या पैकी ५०० कि. नत्र, २५० कि. स्फुरद हे ऑक्टोबर छाटणीच्या वेळी विभागून द्यावीत. सेंद्रीय खते आणि उशिरा उपलब्ध वर खते ऑक्टोबर छाटणीच्या पूर्वी १५ ते २० दिवस अगोदर द्यावीत. नत्र आणि स्फुरदाचा संबंध वेलीवरील काड्या परिपक्क होण्याशी आहे. तसेच नत्र व पालाशचा संबंध घडाच्या वाढीसाठी तसेच घड चांगल्या प्रकारे पक्क्व होण्याशी आहे.
पाणी व्यवस्थापन 
  द्राक्ष वेलीला पाणी अधिक लागत नसेल तरी योग्य वेळी देणे पाणी देणे फार मह्त्वाचे आहे. एप्रिल छाटणीनंतर पाण्याच्या किमान तीन पाळ्या द्याव्यात. ऑक्टोबर छाटणीनंतर हलके पाणी द्यावे. नंतर मात्र २० ते २५ दिवस पाणी देऊ नये. नंतर फळधारणा झाल्यानंतर फळे तयार होईपर्यंत बागेला नियमित पाणी द्यावे. पाण्याची टंचाई भासल्यास वेलीवरील घडांची संख्या कमी करावी तसेच जमिनीवर पालापाचोळा किंवा काळ्या पॉलीथीनचे आच्छादन टाकावे,म्हणजे जमिनीतील ओलावा टिकुन राहतो.ठिबक सिंचन पध्दतिने पिकांची पाणी वापरण्याची घनता २५% नी वाढते.यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होऊन बागायती क्षेत्र वाढविता येते.
अंतरमशागत 
द्राक्षवेलीची लागवड केल्यानंतर तणांचा बंदोबस्त करणे,जमीन भुसभुशीत करून पाणी देण्यासाठी वाफे तयार करणे,हिरवळीची खते देणे,जमिनीत खते मिसळणे व पाणी देणे,रोग-किडीचा बंदोबस्त करने इ.बाबीचा विचार करून अंतर मशागत केली जाते.
द्राक्षबाग छाटणी 
महाराष्ट्रातील हवामानात द्राक्षवेलीची वाढ वर्षभर होत असते.म्हणून द्राक्षवेलीची वर्षातून दोन वेळा छाटणी करतात. साधारणपणे ऑक्टोबर व एप्रिल महिन्यात छाटणी केली जाते. छाटणीचा मुख्य उद्देश कड्यांवरील डोळ्यामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या घडांची वाढ होणे, त्याचबरोबर विक्रीची योग्य वेळ साधून जादा भाव मिळवणे, मशागतीची कामे सोपी होणे, पीक संरक्षण सोपे होणे तसेच कार्यक्षम पाने तयार होण्यासाठी एप्रिल व ऑक्टोबर छाटणीचा उपयोग होतो.
  एप्रिल छाटणीत फक्त खोड व ओलांडे राखून वेलींची बाकीचा सर्व भाग छाटून टाकावा लागतो. म्हणून या छाटणीला खरड छाटणी असे म्हणतात. एप्रिल छाटणीतून ठेवलेल्या डोळ्यावर ऑक्टोबर महिन्यापर्यंत फळे देणा-या नवीन काड्या तयार होतात.
  ऑक्टोबर छाटणी करतांना काडीची पक्वता लक्षात येण्यासाठी काडीवरील पाने एक दोन दिवस अगोदर काढावीत. यावेळी कमजोर, रोगट काड्याही काढून टाकाव्यात. ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस काडीवर किमान ६ ते ९ डोळे राखावेत.

0 आपली प्रतिक्रिया » :

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................