द्राक्षबागेतील तणांचे व्यवस्थापनास द्राक्षबागेच्या उभारणीमध्ये तसेच उत्पादनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तणांच्या व्यवस्थापनामध्ये बागायतदारांसमोर अनेक पर्याय असतात. परंतु त्याचे योग्य नियोजन हे परिस्थितीनुरूप बदलावे लागते.
तणांच्या व्यवस्थापणाची संकल्पना द्राक्ष उभारणी बरोबर चालू होत असते. किंबहुना बहुतेक नियंत्रणास चिवट अशा बहुवर्षीय तणांचे व्यवस्थापन द्राक्ष बाग लागवडीअगोदरच जास्त सोपे असते. द्राक्ष लागवडीसाठी जमिनीची पूर्वतयारी करीत असताना एक-दोन वेळा खोल नांगरट करून हिरळी-लव्हाळासारख्या तणांचा वाढीस कारणीभूत काश्या व गाठी गोळा करून नष्ट केल्यास द्राक्षबागेच्या उभारणीच्या सुरवातीच्या काळात या तणांचा प्रादुर्भाव होत नाही. द्राक्षबाग उभारणीमध्ये पहिली तीन वर्षे तणांचा पादुर्भाव मोठया प्रमाणावर होत असतो. त्यानंतरचे काही वर्षे वेलीच्या सावलीमुळे तणांचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होत जातो. सात ते आठ वर्षानंतर मात्र चिवट अशा बहुवर्षीय तणांची मोठ्या प्रमाणात वाढ होत राहिल्याने त्याच्या बागेतील मशागतीच्या कामावर व उत्पादकतेवर परिणाम होत असतो.
एकात्मिक तण व्यवस्थापण खालील प्रकारांनी करता येवू शकते.
१.तणांचे भौतिक निर्मूलन
२.तणनाशकांचा वापर
३.जैविक पध्दतीने तणांचा नाश
४.आच्छादनांचा वापर
१.तणांचे भौतिक निर्मुलन
द्राक्षबागेतील ओळींमधील तण हाताने खुरपून काढणे आवश्यक ठरते. वेलीपासून दोन्ही बाजूस १.५ ते २ फुटापर्यंत म्हणजेच ओळींचा ३-४ फुटांचा पट्टा अशाप्रकारे तणविहिरीत करावा लागतो. या पट्ट्यामध्ये ठिबकचे पाणी मिळत असल्याने त्याचबरोबर वेलीस दिली जाणारी खते उपलब्ध असल्याने तणांची वाढ खुपच जोमदारपणे होते. छाटणीनंतर पहिले ४० ते ६० दिवस तानांची वाढ जास्त असते व त्यानंतर ती काही अंशी कमी होत जाते. कारण वेलीची सावली पूर्णतः हा भाग व्यापून टाकत असते. त्याचप्रमाणे उन्हाळा व पावसाचे कालावधीमध्ये तणे मोठ्या प्रमाणात वाढतात. त्या मानाने नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये तणांची वाढ कमी होते. तणे फुलो-यामध्ये येण्याअगोदर खुरपून काढल्यास नंतरची वाढ लवकर होत नाही. परंतु हरळी-लव्हाळा यांसारखे तणे खुरपून काढल्या-नंतर त्यांची ३-४ दिवसातच नवीन वाढ झालेली आढळून येते.ही पद्धत खर्चिक असली तरी आवश्यक असते व वर्षातून ९-१० वेळा अशी खुरपणी करणे भाग पडते. हरळी व लव्हाळा यासारख्या तणांचा पूर्ण बंदोबस्त करण्यासाठी जमिनीची तो पूर्ण भाग खोदुन त्यांच्या मुळासहित सर्व भाग एकत्र करून नाहीसे केल्यास त्यांवर चांगले नियंत्रण मिळविणे शक्य होते.
१) द्राक्षबागेच्या ओळीमध्ये ३ ते ४ फुटांचा पट्टा हाताने खुरपून साफ केला जातो. तर दोन ओळीमधील जागेमध्ये शक्यतो ट्रक्टरच्या सहाय्याने कुळवणी करून तण काढले जाते.
२)द्राक्ष्बागेस ठिबक संचाने पाणी दिले जात असल्याने ओळींचा पट्टा किंवा बांधच फक्त ओला होत असल्याने या ठिकाणी तणांची वाढ नियमित होत राहते.
३)पावसाचा काळ वगळता इतर वेळी मधल्या भागात तणांची वाढ होत नाही.
४)ओळीमध्ये वाढणारे तण साधारणपणे दर १५ ते २१ दिवसांनी काढावे लागते व वर्षातून सरासरी ९ ते १० वेळा खुरपणी भाग पडते.
५) तणे फुलावर येण्यापूर्वी काढल्यास नंतरची वाढ लवकर होत नाही.
६)हरळी किंवा लव्हाळयासारखी तणे खुपच वेगाने वाढतात. खुरपणीनंतर ३ ते ४ दिवसांतच त्यांची नवीन वाढ सूरु असताना आढळून येते.
२.तणनाशकांचा वापर
द्राक्षबागेमध्ये काही तणनाशकांचा वापर करणे शक्य असते.यामध्ये प्रमुख्याने पुढील तणनाशकांचा वापर केला जातो.
१.ग्लायफोसेट -उगवलेल्या तणासाठी
२.ऑक्झी फेन्यूरॉन
१) द्राक्षबागेत हरळी व इतर तृणवर्गीय तणांच्या बंदोबस्तासाठी ग्लायफोसेट या तणनाशकाचा ८ मि.ली/प्रती लिटर या प्रमाणात वापर केल्यास १५ ते २१ दिवसांमध्ये पूर्ण तणांचा बंदोबस्त होतो. ग्लायफोसेट हे आंतरप्रवाही तणनाशक असल्याने पानांद्वारे शोषल्याने ते मुळापर्यत पोहचते व मुळाचा नाश होतो.लव्हाळया सारख्या अति चिवट तणाच्या बंदोबस्तासाठी १२ते १५ मिली /लिटर ग्लायफोसेटचा वापर करावा.या तणनाशकाचा वापर करतांना त्यामध्ये युरिया किंवा अमोनिया नायट्रेटचा १.५ ते २% प्रमाणात केल्यास ग्लायफोसेट शोषण होऊन तणनाशकाचा परिणाम चांगला मिळतो.
२) तण उगवन्यापुर्वी ऑक्झीफेन्यूरॉन या तणनाशकाची १.५मिली/लिटर या प्रमाणात जमिनीवर फवारणी करावी.
३) तणनाशकाची फवारणी करतांना जमिनीत वापसा असावा व फवारणी नंतर २४ तासापर्यंत पाणी देऊ नये.
४) तणनाशकाची फवारणी करतांना वैशिष्टपूर्ण ट्रेड नोझल चा वापर करावा व फवारणीचे द्रावण द्राक्षवेलीच्या कोणत्याही हिरव्या भागावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
५)फवारणी करण्यापुर्वी द्राक्ष वेलीच्या बुंध्याशी वाढणा-या फुटी काढून टाकाव्या तसेच जमिनीच्या दिशेने वळलेल्या फुटी मंडपास व्यवस्थित बांधून घ्याव्या.
६) द्राक्ष बाग लागवडी पूर्वी तणनाशकांचा वापर करूनच नवीन लागवड करावी.म्हणजे पुढे काही काळ तणांची समस्या त्रासदायक होत नाही.
७) नवीन द्राक्ष लागवडीमध्ये तणनाशकाची फवारणी करतांना काळजी घेऊन वेलीच्या बुंध्याभोवती प्लास्टिक कागद धरून मगच फवारणी करावी.
८) तणनाशकाची फवारणी शक्यतो बाग छाटणीनंतर लगेच करावी.कारण या काळात वेलीवर पाने नसतात तसेच सूर्यप्रकाश जमिनी पर्यत पोहचत असल्याने तणांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते.
९) विशेष सूचना द्राक्षबागेत २-४-डी या तणनाशकाचा वापर कोणत्याही परिस्थितीत करू नये.
३.जैविक पद्धतीने तणांचा बंदोबस्त करणे
जैविक पद्धतीने तणांचा बंदोबस्त खालील प्रकारे करता येऊ शकतो
अ) पीक फेरपालट
ब) आंतरपिके
क) तण खाना-या किडींचा वापर
४.आच्छादनांचा वापर
या मध्ये चवळी,उडीद, मुग,ताग ,मका,बाजरी अशी हिरवळीची पिके जिवंत अच्छादन म्हणून घेता येतात.अशी हिरवळीची पिके फुलावर आल्यानंतर तेथेच युपटून जमिनीवर आडवी करावी किंवा जमिनीत गाडावीत,तसेच इतर उगवलेल्या गवतांचे /तणांचे अशाच पद्धतीने जमिनीवर आच्छादन केल्यास तणांचा चांगलाच बंदोबस्त होतो.
५.इतर उपाय - अ) यंत्राद्वारे जमिनीची मशागत करणे:
द्राक्षबागेत दोन ओळीमधील पट्टा तण विरहीत ठेवण्यासाठी यापद्धतीचा अवलंब करता येतो.दोन ओळी त्या दृष्टीने योग्य अंतर राखणे आवश्यक असते.याप्रकारे मशागत करीत असतांना वेलीपासून कमीत-कमी २ फुटांचे अंतर असावे.कोळपणी किंवा वखरणी चा वापर केला जातो.दोन ओळीमधील या जागे मध्ये तणांचा प्रादुर्भाव फक्त पावसाळी कालावधीमध्येच होत असतो.
फवारणीसाठी तसेच इतर कामांसाठी ट्रक्टर व मजूरांचा होणारा वावर यामुळे या ठिकाणी तणे पायदळी तुडवली जातात व त्यांची वाढ आपोआप खुटते.परंतु त्याच्या नंतर वखरणी केल्यास तणांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो.
ब) पाणी देण्याच्या पद्धत:
पाणी देण्याच्या पद्धतीचा तणांच्या वाढीवर परिणाम होत असतो.प्रवाही सिंचन पद्धत द्राक्षबागेमध्ये सध्या प्रचलित नाही. परंतु काहीवेळा द्राक्षबागेस पाटपाणी दिले जाते. व त्यानंतर तणांची वाढ एकदम फोफावते. ठिबक सिंचन पध्दतीमध्ये वेलीच्या ओळींचा साधारणतः एक मीटर रुंदीचा पट्टा ओलसर होत असल्याने तेवढयाच भागात तणांची वाढ होते. 'सब सरफेस इरिगेशन' अर्थात जमिनीखाली २० ते २५ सें.मी. पाणी दिल्यास द्राक्ष वेलीस पाणी मिळू शकते. परंतु तणांच्या वाढीसाठी पाणी उपलब्ध न झल्याने त्यांचे वाढीस काही प्रमाणात अटकाव येतो.

Rss Posts
1 आपली प्रतिक्रिया » :
द्राक्षे बागेत Strongarm या तणनाशकाचा परिणाम काय होतो
टिप्पणी पोस्ट करा
द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.