थंडीचा द्राक्ष बागेवर होणारा परिणाम

सध्याच्या परिस्थितीमध्ये थंडीचा द्राक्ष बागेच्या वाढीवर परिणाम होताना दिसतो आहे. द्राक्ष बागेमध्ये सध्या वेगवेगळ्या परिस्थिती आढळून येतात. उशिरा छाटणी केलेल्या बागेत सध्या नऊ ते दहा मि.मी. आकाराचे मणी असतील, तर वेळेवर किंवा लवकर छाटलेल्या बागेत मण्यांमध्ये पाणी उतरायला सुरवात झाली असेल. अशा या परिस्थितीमध्ये थंडीचा घडांच्या वाढीवर कसा परिणाम होतो या संदर्भातील माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर
सध्याच्या परिस्थितीमध्ये अति थंडी आपण अनुभवतो आहे. या वेळी प्रत्येक बागेत घडाचा विकास होण्याची अवस्था मात्र आढळून येईल. घडाचा विकास होण्याकरिता वेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग तेवढाच संतुलित असणे गरजेचे होते. त्या सोबत संजीवकांचा वापर केल्यामुळे मण्यातील प्रत्येक अवयवांमध्ये वाढ होण्याची शक्ती निर्माण होते. बागेत ही प्रक्रिया चालू राहण्याकरिता ठराविक तापमान महत्त्वाचे असते. तेव्हाच इतर गोष्टींचा फायदा होतो.
सध्याच्या परिस्थिमध्ये ज्या बागेत मण्यात पाणी उतरायला आठ ते दहा दिवस आहेत, अशा बागेत आता लवकरच मण्याचा आकार वाढवणे गरजेचे होते. परंतु किमान तापमान हे फारच कमी झाल्यामुळे वेलीमध्ये क्रिया मंदावल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणजे मण्याचा आकार वाढणे थांबले असे आपण म्हणतो. पाणी उतरल्यानंतर जवळपास तीन मि.मी. आकार वाढतो. तेव्हा पाणी उतरेपर्यंत बऱ्यापैकी आकार वाढवून घेणे गरजेचे होते. हा आकार वाढविण्यासाठी आपण पुन्हा संजीवकाचे डीप घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचा चांगला परिणाम मिळावा म्हणून त्यामध्ये स्टिकरसुद्धा मिसळले जाते; परंतु सध्या जर थंडी आहे तर विकास होणार नाही. म्हणजेच आपण ज्या उपाययोजना केल्या त्याचा फायदा झाला नाही किंवा होणार नाही. उलट मण्यावर स्टिकरमुळे पांढरे डाग दिसायला लागतात. हे डाग पुसून जाण्याकरिता आपण पुन्हा कोणती फवारणी करावी याबद्दल चौकशी करतो. आता संजीवकांचीसुद्धा विशिष्ट मर्यादा ठरवल्यामुळे निर्यात करणाऱ्या द्राक्षाकरिता या गोष्टींचा विचार करणे गरजेचे झाले आहे.
घडावर गाठी येणे आणि देठ सुकणे -
घडावर गाठी येणे तसेच देठ सुकून मणी सुकण्याची समस्या या वर्षी बऱ्याच बागांमध्ये दिसून आली आहे. ज्या बागेत ही परिस्थिती आढळून येते, अशा बागेत बारकाईने निरीक्षणे केल्यास घडाच्या पुढील काडीवर प्रत्येक डोळ्यांवर फुगीर भाग म्हणजेच गाठीप्रमाणे चित्र दिसते. अशा ठिकाणी पेरासुद्धा लहान दिसतो. काही ठिकाणी जुनी काडी सुद्धा अशीच दिसते. याच काडीवर आलेला घड सुद्धा अशाच प्रकारचा आहे. घडाच्या दांड्यावर गाठ दिसते, ही गाठ पोकळ असते. मण्यात पाणी उतरत असताना त्या गाठीवर चीर पडते आणि तो घड निकामी होतो. त्यामुळे नक्कीच या परिस्थितीमध्ये वेलीवर एकतर कुठल्या तरी गोष्टींचा ताण बसला असावा किंवा काही गोष्टींचा अतिरेक झाला असावा किंवा या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला असल्याने त्याचा परिणाम म्हणून ही परिस्थिती उद्‌भवली असावी. सध्या जरी यावर उपाय दिसत नसला तरी ही परिस्थिती टाळण्याकरिता खरड छाटणीच्या वेळी मात्र विशेष काळजी घेणे महत्त्वाचे राहील.
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे येथे कार्यरत आहेत.)
सध्याच्या परिस्थितीमधील उपाययोजना -
सध्याच्या थंडीच्या कालावधीत बागेतील तापमान कसे वाढवता येईल याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. बागेत मशागत करून मोकळे पाणी देणे, शेडनेटचा वापर करणे, पेपरने घड झाकून घेणे, इत्यादी गोष्टी आपल्याला तातडीने करता येतील. या सोप्या उपाययोजना केल्यास त्याचा फायदा घडाच्या विकासाकरिता नक्कीच होऊ शकेल. बागेत सकाळी शेकोटी पेटवून तापमान वाढवता येईल, परंतु प्रत्येक ठिकाणी हे शक्‍य होईल असे नाही. बोदावर आच्छादन करून घ्यावे. यामुळे मुळांतील तापमान चार ते पाच अंश से.ने वाढते. अशा परिस्थितीमध्ये मुळी सुद्धा काम करायला लागते आणि थोडेफार तरी अन्नद्रव्य वर उचलले जाऊन घडाचा विकास होण्यास मदत होईल.

0 आपली प्रतिक्रिया » :

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................