द्राक्ष निर्यातीसाठी नवीन बाजारपेठांचा शोध हवा


द्राक्ष उत्पादन व निर्यातीत वृद्धी होण्यासाठी राज्यातील नाशिक, सांगली, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर इ. जिल्ह्यांना कृषी निर्यात क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ समन्वय संस्था म्हणून काम पाहते. कृषी निर्यात क्षेत्रांतर्गत अत्याधुनिक सुविधांचा वापर करून निर्यातदार आणि द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीला गती दिली पाहिजे. 
भारतातील सन 2010-11 मधील फळ उत्पादन 74.88 दशलक्ष टन होते, तर जागतिक फळ उत्पादन 599.30 दशलक्ष टन इतके होते. फळ उत्पादनामध्ये चीन प्रथम स्थानावर असून त्यांचे फळ उत्पादन 122.18 दशलक्ष टन आहे. त्या खालोखाल भारताचे उत्पादन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला परकीय चलन मिळवून देण्याच्या दृष्टीने फळपिकांना चांगलेच महत्त्व आहे. द्राक्ष उत्पादनाचा विचार करता जागतिक द्राक्ष उत्पादन सन 2010-11 मध्ये 67.32 दशलक्ष टन होते. यामध्ये चीन (8.65 दशलक्ष टन) प्रथम स्थानावर, त्या खालोखाल इटली, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, तुर्की, चिली, अर्जेंटिना व त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारताचे सन 2009-10 मध्ये द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र सुमारे 111 हजार हेक्‍टर होते. त्यापासून सुमारे 1.24 दशलक्ष टन इतके उत्पादन मिळाले होते. भारताच्या फळबागेखालील एकूण क्षेत्रापैकी द्राक्षाचा वाटा 1.74 टक्के असून, एकूण फळ उत्पादनातील वाटा 1.65 टक्के इतका आहे. भारत देश एकूण फळांच्या उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावर असला, तरी द्राक्ष उत्पादनात मात्र नवव्या स्थानावर आहे. 

द्राक्ष क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता - 
भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मिझोराम ही प्रमुख द्राक्ष उत्पादक राज्ये आहेत. यात महाराष्ट्राचे सन 2010-11 मधील द्राक्ष उत्पादन सर्वाधिक म्हणजे 0.77 दशलक्ष टन इतके होते. सन 2008-09 मध्ये भारताचे द्राक्ष उत्पादन 18,78,300 टन इतके उत्पादन झाले होते. त्या वेळेस महाराष्ट्रातून सुमारे 14,15,000 टन इतके, म्हणजे भारताच्या एकूण द्राक्ष उत्पादनाच्या 74.33 टक्के उत्पादन झाले होते. मात्र सन 2009-10 या कालावधीत द्राक्ष उत्पादनात कमी उत्पादकतेमुळे घट झालेली दिसली. या कालावधीत भारताच्या एकूण द्राक्ष उत्पादनाच्या 49.96 टक्के, तर सन 2010-11 मध्ये 62.68 टक्के उत्पादन राज्यात झाले. उत्पादकतेचा विचार करता उत्पादकता सन 2008-09 च्या तुलनेत कमी झालेली आहे. 

द्राक्ष - राज्यनिहाय क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता - 
भारताची राज्यनिहाय द्राक्ष फळपिकाखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता तक्ता 1 मध्ये दिली आहे. 
सन 2010-11 मध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटकाचे द्राक्ष उत्पादन 3,30,300 टन त्या खालोखाल तमिळनाडूचे 53,000 टन, आंध्र प्रदेशचे 27,600 टन, तर मिझोरामचे 20,400 टन इतके होते. भारतातील द्राक्षाचा क्षेत्र व उत्पादनात, महाराष्ट्राचा प्रमुख वाटा आहे. महाराष्ट्राची द्राक्षे भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहेत. द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र व उत्पादनात, देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असला तरी उत्पादकतेत मात्र मागे आहे. 
उत्पादन खर्च - 
द्राक्ष उत्पादनामध्ये साधारणपणे नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर हे जिल्हे आघाडीवर आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादन खर्चाचा अभ्यास केला असता साधारणपणे प्रति हेक्‍टरी रुपये 4,65,000 पर्यंत सरासरी खर्च येत असल्याचे निदर्शनास आले. प्रति क्विंटल उत्पादन खर्चाचा विचार करता रुपये 2,500 इतका सरासरी खर्च येत असल्याचे आढळले. 

एकूण उत्पादन खर्चामध्ये खजुरावरील मजुरी, पीक संरक्षण, सेंद्रिय व रासायनिक खते इत्यादी बाबींवरील खर्च जास्त असल्याचे आढळले. 

राज्यातील द्राक्ष विक्रीचा आढावा - 

सन 2011 मधील राज्यातील प्रमुख बाजारपेठांचा अभ्यास केला असता असे निदर्शनास येते, की द्राक्षास मुंबई व नागपूर बाजारपेठेत डिसेंबर महिन्यात सर्वाधिक किंमत मिळाली तर पुणे व नाशिक बाजारपेठेत एप्रिल महिन्यात सर्वाधिक किंमत मिळाल्याचे दिसून आले. राज्यातील महत्त्वाच्या चारही बाजारपेठांचा विचार करता सर्वाधिक किंमत ही मुंबई बाजारपेठेत (7,652 रुपये प्रति क्विंटल) मिळाली. सर्वांत कमी किंमत ही नागपूर बाजारपेठेत (3,573 रुपये प्रति क्विंटल) मिळाली. राज्याचा विचार करता मुंबई ही द्राक्ष विक्रीच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्र राज्याबाहेरच्या बाजारपेठांचा विचार करता चेन्नई, दिल्ली व कोलकता या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. सन 2011 मध्ये मे महिन्यात सर्वाधिक किंमत (8,584 रुपये प्रति क्विंटल) कोलकता बाजारपेठेत मिळाली. त्या खालोखाल दिल्ली बाजारपेठेत (8,213 रुपये प्रति क्विंटल) आणि चेन्नई बाजारपेठेत (6,223 रुपये प्रति क्विंटल) मिळाली. 

द्राक्ष निर्यातीतील संधी - 
देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षविक्रीस चांगला वाव आहे. भारतीय द्राक्षाची निर्यात प्रामुख्याने नेदरलॅंड, बांगलादेश, इंग्लंड, युनायटेड अरब, रशिया, सौदी अरेबिया, बेल्जियम, थायलंड, स्वीडन, नॉर्वे इत्यादी देशात जास्त प्रमाणात होत आहे. 

निर्यातीच्या अभ्यासावरून असे निदर्शनास येते, की भारतातील द्राक्षांची सर्वाधिक निर्यात ही बांगलादेशात होत आहे; मात्र सर्वाधिक उत्पन्न नेदरलॅंडमधूनच मिळत असल्याचे दिसून येते. त्या खालोखाल इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, रशिया, सौदी अरेबिया, बेल्जियम इ. देशात निर्यात होत आहे. सन 2009-10 च्या तुलनेत सन 2010-11 मधील निर्यातीत घट झालेली आहे. सन 2009-10 मध्ये एकूण निर्यात 1,17,337.50 मे.टन इतकी होती, त्यापासून रु. 43,106.50 लाख इतके उत्पन्न मिळाले होते. मात्र सन 2010-11 मध्ये त्यात घट होऊन 93,609.30 मे.टन इतकी निर्यात झाली. त्यापासून रु. 37,395.40 इतके उत्पन्न मिळाले. 

निर्यातीतील अडचणी - 
* द्राक्ष उत्पादकांना निर्यातीमधील नुकसानीस शासकीय अनुदानाची तरतूद नाही. 
* वाहतूक कालावधीमध्ये मुंबई ते लंडन विमा संरक्षणाची सोय नाही, त्यामुळे नुकसानीची भीती असते. 
* निर्यातीसाठी आवश्‍यक द्राक्ष मण्यांचा 18 मि.मी. आकार प्राप्त करण्यास काही वेळा अडचणी येतात. 
* द्राक्ष निर्यातीसाठी आवश्‍यक शीतगृहांचा वापर फक्त तीन महिने होतो, त्याशिवाय सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे जनरेटरसाठी डिझेलचा खर्च जादा येतो. 
* आयात केलेल्या वेष्टण साहित्याचा वापर करण्याची सक्ती आहे, त्यामुळे परकीय साहित्यावर अवलंबित्व वाढले. 
* अमेरिकन जहाज वाहतूक कंपन्यांकडून जादा सागरी वाहतूक भाड्याची आकारणी होत असल्याने मिळणाऱ्या लाभाच्या प्रमाणात घट होते. 
* देशांतर्गत खराब रस्त्यामुळे द्राक्ष मणी गळणे व तडे जाण्याच्या अडचणी निर्माण झाल्याने योग्य भाव मिळत नाही. 
* द्राक्ष निर्यातीचा परवाना बिगर द्राक्ष उत्पादकांना दिला जात असल्यामुळे चांगल्या प्रतीच्या व रसायनांच्या अवशेषाचे कमी प्रमाणात असणाऱ्या द्राक्षांची निर्यात होत नाही. 
* द्राक्ष निर्यातीस आवश्‍यक युरोगॅप नोंदणीविषयक पद्धत किचकट असल्यामुळे अनेक शेतकरी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहत आहेत. 

द्राक्ष निर्यात वृद्धीसाठी उपाययोजना - 
* निर्यातीसाठी नवीन बाजारपेठांचा शोध घेऊन तेथील किमती, ग्राहकांच्या आवडी, मागणीचा कालावधी आणि प्रत याबाबत माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी.
* निर्यातक्षम योग्य आकाराच्या द्राक्ष उत्पादनासाठी नवीन वाणांची उपलब्धता करून द्यावी. 
* चांगल्या द्राक्षांच्या निर्मितीसाठी निर्यात परवाना फक्त द्राक्ष उत्पादक आणि द्राक्ष संघांना देण्यात यावा. 
* रसायनांच्या अवशेषांचा परिणाम टाळण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, निर्यातीस प्रतिबंध असलेल्या कीडनाशकांच्या उत्पादनावर शासनाने बंदी घालावी. 
* रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जैविक कीडनाशक व रोगनाशक उपाययोजनांविषयी जनजागृती करावी. 
*"अपेडा'ने वेळोवेळी निर्यातीसंदर्भातील बदलत्या निकषांची माहिती उत्पादकांपर्यंत पोचवावी. तसेच उत्पादकांनी "अपेडा'च्या संपर्कात राहावे. 

संपर्क - 02426-243236 
( लेखक कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत) 

1) राज्यनिहाय द्राक्ष फळपिकाखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता (सन 2010-11) 
राज्यक्षेत्र (000 'हे.)उत्पादन (000 'टन)उत्पादकता (टन/ हे.) 
महाराष्ट्र86.00774.009.00 
कर्नाटक18.10330.3018.30 
तमिळनाडू2.7053.0019.30 
आंध्र प्रदेश1.3027.6021.00 
मिझोराम1.6020.4012.90 
इतर1.7029.5017.30 
भारत111.401234.9011.10 
संदर्भ - भारतीय फलोत्पादन सांख्यिकी, 2011 

 2) द्राक्ष पिकाचा सरासरी उत्पादन खर्च (रु./ क्विंटल) 
अ. क्र.खर्चाच्या बाबीखर्च 
1)खर्च "अ'2,82,000.00 
2)खर्च "ब'4,43,000.00 
3)खर्च "क'4,65,000.00 
4)प्रति क्विंटल2,500.00 

 3) भारतीय द्राक्षाची देशनिहाय निर्यात व मूल्य 
अ. क्र.देश2009-102010-11 
निर्यात (टन)निर्यात मूल्य (रु. लाख)निर्यात (टन)निर्यात मूल्य (रु. लाख) 
1)नेदरलॅंड28,821.9016,755.5017,681.5011,798.10 
2)बांगलादेश44,419.205,213.4038,052.005,142.10 
3)इंग्लंड14,308.508,165.707,550.404,743.80 
4)युनायटेड अरब10,053.604,189.109,545.904,511.10 
5)रशिया745.80598.202,368.801,838.10 
6)सौदी अरेबिया3,656.001,537.903,484.301,421.30 
7)बेल्जियम2,859.601,756.901,677.701,373.30 
8)थायलंड875.60741.201451.501335.50 
9)स्वीडन276.70145.20932.30620.90 
10)नॉर्वे799.20600.70665.40564.20 
11)इतर1,052.503,402.8010,199.704,047.10 
एकूण1,17,337.5043,106.5093,609.3037,395.40 
संदर्भ - राष्ट्रीय फलोत्पादन सांख्यिकी अहवाल, 2011

0 आपली प्रतिक्रिया » :

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................