द्राक्षवेलीसाठी फर्टीगेशनचे नियोजन

गोडी छाटणीसाठी विद्राव्य खतांच्या ग्रेड्स निवडतांना व त्याचे दररोजचे प्रमाण वाढविण्यासाठी द्राक्षवाढीच्या विविध अवस्थांचा विचार करणे आवश्यक आहे.गोडी छाटणीपासून ते द्राक्ष काढणीपर्यंत द्राक्षवेलीच्या वाढीच्या अवस्थेनुसार लागणारी अन्नद्रव्यांची गरज व वापरावयाच्या विद्राव्य खतांच्या ग्रेड्स पुढील प्रमाणे -
छाटणी पासून ते पहिले १५ दिवस  
या अवस्थेत डोळे फुट होत असतांना नत्राचे प्रमाण हे स्फुरद व पालाश यांच्या पेक्षा दुप्पट लागते.म्हणजे एकसारखी डोळे फुट होते.या मध्ये २०:१०:१० +१ मग्नेशीअम +सूक्ष्मअन्नद्रव्ये ही ग्रेड उपयुक्त आहे.
काडीच्या वाढीची अवस्था
या अवस्थेमध्ये घड बाहेर पडत असतात व काडीची वाढ होत असते म्हणून नत्र,स्फुरद,व पालाश यांचे प्रमाण एकसारखे ठेवावे लागते.म्हणून २०:२०:२०: किंवा १९:१९:१९ + मग्नेशीअम +सूक्ष्मअन्नद्रव्ये ही ग्रेड वापरावी 
फुलोरा व फलधारणा
या अवस्थेमध्ये नत्र व पालाशच्या तुलनेत स्फुरदाचे प्रमाण जास्त लागते म्हणून १२:६१:०० ही ग्रेड वापरावी .
फळधारणा ते मणी वाढीची अवस्था 
या अवस्थेमध्ये द्राक्ष वेलींना नत्र,स्फुरद व पालाश १:३:१ या प्रमाणात लागतो म्हणून १३:४०:१३ हि ग्रेड वापरावी.
मण्यात  पाणी फिरण्याची अवस्था
या अवस्थेमध्ये अत्यंत कमी कमी प्रमाणात नत्र व भरपूर पालाश लागतो म्हणून १३:००:४५ ही ग्रेड वापरावी.
फळ पक्वतेची अवस्था
या अवस्थेमध्ये मण्यांमध्ये साखर भरत असते.म्हणून पालाश बरोबर सल्फर असल्यास साखरेचे प्रमाण वाढते व फळ पक्वता लवकर होते.त्यामुळे ००:००:५० +१८% सल्फर ही ग्रेड उपयुक्त ठरते.तसेच मालाची साठवणूक क्षमता वाढते.
 फर्टीगेशन करत असतांना घ्यावयाची काळजी
गेल्या १५ हंगामातील अनुभवांचा विचार करता  फर्टीगेशन तंत्रज्ञान अवलंबताना खालील गोष्टींचा बारकाईने विचार व कृती होणे गरजेचे आहे.
१.शेड्यूलसं मध्ये दिलेली खतांची मात्रा ही सर्व साधारणपणे द्राक्षाला लागणा-या अन्नद्रव्यांची एकूण गरज व चाचणी प्रयोगाचे निष्कर्ष यांच्यावरून ठरवण्यात आलेली आहे.त्यामध्ये माती आणि देठ पृथक्करण अहवालानुसार योग्य वेळी योग्य तो बदल करून घेणे गरजेचे आहे.
फर्टीगेशनचा चांगला फायदा मिळवण्यासाठी छाटणीपूर्वी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे.हे केल्याने जमिनीचा प्रकार, जमिनीचा पीएच (सामू) , सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता,सेंद्रीय कर्ब ,चुनखडीचे प्रमाण व जमिनीची क्षारता या सर्व गोष्टी कळतात.त्या नुसारच खतांची मात्रा ठरवावी.
३.बदलते हवामान अवेळी पाउस या सर्व गोष्टींचा विचार करून व आपल्या अनुभवानुसार यामध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे.उदा. जर शेंडा वाढ ही अत्यंत जास्त असेल व हवामान अनकूल असेल तर नत्रयुक्त खतांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.
४.विद्राव्य खतांची मात्रा ही जास्तीत जास्त वेळा विभागणी करून देणे केव्हाही चांगले असते.
५.फर्टीगेशन करत असतांना ठिबक संचाची काळजी घेणे आवश्यक आहे ,प्रत्येक वेलीला समान प्रमाणात खते मिळतीलच ही काळजी घेणे खुपच महत्वाचे आहे.

0 आपली प्रतिक्रिया » :

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................