"फार्मनीड'ची मदत घ्या, वेळीच द्राक्ष बाग वाचवा"


परदेशांप्रमाणे शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर आपल्याकडेही होऊ लागला आहे. पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने सुरू केलेल्या फार्मनीड या संकेतस्थळाचा फायदा आता बागायतदारांना चांगल्या प्रकारे घेणे शक्‍य झाले आहे. आपल्या बागेतील हवामान अंदाजाबरोबर डाऊनी, भुरी या महत्त्वाच्या रोगांची पूर्वसूचना मिळून त्यांचे वेळीच नियंत्रण करणे त्यातून शक्‍य होणार आहे. परिणामी, अनावश्‍यक फवारण्या कमी होऊन खर्चात बचत होणार आहे.
दत्तात्रय आवारे
बदलत्या हवामानानुसार द्राक्ष बागेत येणाऱ्या रोगांना नियंत्रणात आणताना बागायतदारांच्या नाकीनऊ येते. त्यासाठी खर्चिक फवारण्या घ्याव्या लागतात. अनेक वेळा फवारणीनंतर काही कालावधीतच पाऊस पडतो आणि द्रावण धुऊन जाते. पुन्हा फवारणी घ्यावीच लागते. परिणामी, फवारणींची संख्या आणि उत्पादन खर्चही वाढतो. या समस्यांवर उपाय शोधताना पुण्याच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने (एनआरसी) स्थानिक हवामान अंदाजानुसार (लोकेशन स्पेसिफिक) डाऊनी, भुरी रोगांचा अंदाज व त्यानुसार फवारणीचा सल्ला संकेतस्थळाद्वारे (वेबसाइट) देणे सुरू केले आहे. गेल्या दोन वर्षांत काही बागायतदारांच्या बागेत याचे प्रयोग घेतले, ते यशस्वी ठरले.

...असे आहे संकेतस्थळ 
परदेशांप्रमाणे शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर आपल्याकडेही होऊ लागला आहे. त्यादृष्टीने बागेत रोगाच्या धोक्‍याची माहिती मिळून नियंत्रण शक्‍य होणार आहे. भारतातील एका खासगी कंपनीने एनआरसीच्या मार्गदर्शनातून "फार्मनीड' हे संकेतस्थळ तयार केले आहे. तसेच राज्यातील द्राक्ष विभागात काही हवामान केंद्रे बसविली आहेत. त्याआधारे तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग इ. घटकांचा अंदाज, बागेत पुढील सात दिवसांत असलेला रोगांच्या धोक्‍याचा अंदाजही दिला जातो. 

संकेतस्थळाचा वापर करण्यासाठी 
आवश्‍यक बाबी 
-घरी किंवा आसपास संगणक व इंटरनेट कनेक्‍शन हवे 
-शेतकऱ्याचा स्वतःचा ई-मेल आयडी हवा. 
-आपल्या ई-मेलवरून महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ किंवा एक्‍स्प्रेस वेदर किंवा एनआरसीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सावंत यांच्याकडे ई-मेल पाठवावा लागेल. या मेलमध्ये शेतकऱ्याने आपले नाव, गाव, गावाजवळचे हवामान केंद्र, बागेचा अक्षांश, रेखांश आदी माहिती पाठवायची असते. 

इंटरनेटवरून "गुगल अर्थ' डाऊनलोड करावे."गुगल अर्थ' डाऊनलोड www.google.com/earth/download/ge येथे क्लिक करा. त्यावरून शेताच्या क्षेत्राफळाचा शोध घेऊन त्या नकाशावर संगणकाचा कर्सर नेल्यास त्याखालील बाजूस अक्षांश व रेखांशाचे आकडे दिसतात. या आकड्यांची नोंद करावी किंवा संगणकावरील "प्रिन्ट स्क्रीन ऑप्शन'संबंधीचे बटण दाबून आपल्या क्षेत्रफळाचे छायाचित्र मेलला जोडून पाठवावे. त्यानंतर शेतकऱ्यांना मेलवर त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड पाठविला जातो. 

...असा करा वापर 
संकेतस्थळाच्या पत्त्यावर जाऊन दिलेला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून साईनइन केले, की शेतकऱ्याचे स्वतःचे वेबपेज उघडते. त्यावर डाव्या बाजूस काही पर्याय दिलेले आहेत. प्रत्येक पर्यायाला क्‍लिक केल्यास त्यानुसार माहिती मिळते. यातील करंट कंडिशन या पर्यायास क्‍लिक केल्यास पुढील सात दिवसांत आपल्या बागेतील हवामानाचा अंदाज दिलेला असतो. याची प्रत्येक तासाची माहिती मिळते. मागील एका तासाच्या हवामानाची माहिती, पानांतील ओलसरपणा, कॅनॉपीचे तापमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा, सोलर रेडिएशन, वातावरणाचा दाब आणि पाऊस आदी रेकॉर्ड डेटाही मिळतो. 

डीएफएस (रोगाचा अंदाज देणारी पद्धती) या पर्यायाला क्‍लिक केल्यास जे पेज दिसते त्यावर सिलेक्‍ट लोकेशन या पर्यायात आपल्या गावाचे नाव द्यावे. त्यानंतर पुढील सात दिवसांत वातावरणाच्या अंदाजानुसार आपल्या बागेत डाऊनी व भुरी रोगाचा धोका किती आहे त्याची माहिती मिळते. चार रंगांत याचे वर्गीकरण केले असून अति धोका, मध्यम धोका, कमी धोका आणि धोका नाही अशी माहिती त्यातून मिळते. 

डीएसएस (डिसिजन सपोर्ट सिस्टिम) या पर्यायाला क्‍लिक केल्यास त्यावर सहा प्रश्‍न दिले आहेत. योग्य सल्ला मिळण्यासाठी प्रश्‍नांची योग्य उत्तरे भरणे आवश्‍यक असते. यात तुमच्या बागेत सध्या रोग आहे का, रोगासाठी तुम्ही कोणते बुरशीनाशक फवारले वगैरे प्रश्‍न असतात. त्यांची उत्तरे भरून दिल्यावर खालील बाजूस सबमीट असा पर्याय असतो, त्यावर क्‍लिक केल्यास पुढील पेज उघडते. यात आपल्या बागेत डाऊनी किंवा भुरी जो रोग असेल, तसेच तो कोणत्या प्लॉटमध्ये आहे (आपल्या बागेच्या क्षेत्रानुसार प्लॉटला नावे द्यावीत. उदा. प्लॉट नं.1,2) ही माहिती द्यावी. पेजवर द्राक्ष पिकाच्या विविध अवस्थेतील छायाचित्रे असतात. त्यापैकी जी अवस्था तुमच्या बागेत असेल त्याचा क्रमांक द्यावा. त्यानंतर सबमीट पर्यायावर क्‍लिक केले तर पुढील पेज उघडते. त्यावर तुमच्या बागेत पुढील सात दिवसांत रोगाचा धोका कधी आहे? पावसाचा अंदाज मिळतो. (50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त शक्‍यता असेल तर लाल आणि त्याहून कमी शक्‍यता असेल तर हिरवा रंग दिसतो). त्यानुसार बागेत कोणत्या फवारण्या किती प्रमाणात घ्याव्या याची माहिती असते. लेबल क्‍लेम व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार बुरशीनाशकांच्या शिफारशींचे त्यांच्या "पीएचआय'सह वेळापत्रक असते. त्यावरून रोग येण्यापूर्वीच त्याचे नियंत्रण फवारणीद्वारे करणे शक्‍य होते. पाऊस कधी पडणार याचीही माहिती असल्याने फवारणी वाया जात नाही. त्यामुळे फवारणींची संख्या कमी होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. शिवाय केलेल्या एकूण फवारण्यांची नोंद यात संग्रहित होते. 

सद्यःस्थितीत मोफत सुविधा 
सध्या बागायतदारांना हा सल्ला प्रायोगिक तत्त्वावर मोफत दिला जात आहे. काही कालावधीनंतर संकेतस्थळावरील सर्व पर्याय पूर्णपणे वापरात आल्यानंतर माफक शुल्क आकारून ही माहिती मिळू शकेल. सद्यःस्थितीत शंभर बागायतदार या सुविधेचा फायदा घेत आहेत. चालूवर्षी एक हजार शेतकऱ्यांना ही सुविधा देता येऊ शकते. कंपनीच्या हवामान केंद्राच्या आवारात पाच शेतकरी याचा उपयोग करत असतील तर आपल्या परिसरातील इतर शेतकऱ्यांना याबाबत माहिती देऊन ते मदत करू शकतात. हवामान केंद्रांच्या उभारणीसाठी लागणारा निधी फलोत्पादन विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने दिला आहे. हवामान केंद्रांची देखभाल, शेतकऱ्यांशी संपर्क आणि माहितीचा प्रसार करण्याचे काम द्राक्ष बागायतदार संघाकडून केले जात आहे. 

हवामान केंद्राचे जाळे 
कंपनीच्या हवामान केंद्रांची स्थिती पाहता सोलापूर जिल्ह्यात कुमठा, कासेगाव आणि नानज येथे तीन, नारायणगाव (जि. पुणे) येथे दोन, नाशिक जिल्ह्यात 50 आणि सांगली जिल्ह्यात 40 हवामान केंद्रे बसविण्यात आली आहेत. या केंद्राच्या सेन्सरमध्ये एक सीमकार्ड बसविण्यात आले आहे. त्याद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येक तासाची माहिती कंपनीला मिळत असते, ती संकेतस्थळाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पुरविली जाते. 

स्मार्टफोनचाही पर्याय 
बाजारात विविध कंपन्यांचे मोबाईल स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यात इंटरनेटद्वारे "फार्मनीड' संकेतस्थळाचा वापर करता येऊ शकतो. अनेक शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणाहून या सुविधेचा वापर करणे शक्‍य झाले आहे. 
- डॉ. एस. डी. सावंत 
- 020 - 26956032, 

1 आपली प्रतिक्रिया » :

Rahul Dhikale म्हणाले...

me mail kela hota Dr. sawant sirana ..but khup divas jhalet reply nahi alay tyancha..

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................