...असे ठेवा द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या अवस्थेतील कामे सुरू आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता, बागेत पावसाळी वातावरण नाही. त्यामुळे रोगाच्या समस्या कमी असतील. परंतु इतर काही कामे करत असताना बागेत काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दलची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
खुंटावर कलम केलेल्या बागेत डोळे फुटून निघाले असतील. काही ठिकाणी डोळे उमलण्यास अडचण येत असावी. ज्या बागेत कलम केले आहे, अशा बागेत सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गवत काढून बाग स्वच्छ ठेवावी. कारण पाऊस झाला असेल अशा ठिकाणी जमिनीत जास्त आर्द्रता अनुभवास येईल. याचसोबत गवत जास्त असल्यास कलम जोडाजवळ पुन्हा जास्त आर्द्रता वाढेल. कलम जोड व जमीन यामधील अंतर फार कमी असल्यामुळे डाऊनीचा त्रास जास्त वाढू शकतो. कलम जोडावर रोग आल्यास ती कलम पूर्णत: वाया जाऊ शकते. कारण कलम जोडाच्या अवतीभवती गवत असल्यामुळे फवारणी व्यवस्थित करता येत नाही.
फळछाटणी झालेली बाग :
ज्या बागेत नुकतीच फळछाटणी झाली आहे, अशा बागेत आता डोळे फुटून घड बाहेर येण्याची स्थिती असावी. पाऊस संपून जवळपास एक आठवडा झाला, त्यामुळे या वेळी घड जिरण्याची समस्या कमी असेल. वातावरणात जास्त तापमान व आर्द्रता असेल, अशावेळी फूटसुद्धा जास्त जोमात दिसेल. अशा वातावरणात कमीत कमी हायड्रोजन सायनामाईडचा वापरसुद्धा चालेल; परंतु एकसारखी फूट निघावी या दृष्टीने जाड काडी पुन्हा एकदा पेस्ट करावी किंवा पहिल्यांदा पेस्टिंग करतेवेळी जाड काडी मोडून किंवा पिळून घ्यावी. यामुळे एकसारखी फूट बाहेर येण्यास मदत होईल. या बागेत वाढीकरिता पोषक वातावरण असल्यामुळे वाढ जास्त होईल. म्हणजेच फेलफूट लवकर काढून टाकण्याची अवस्था लवकर येईल. फुटीमध्ये अन्नद्रव्य वाया जाणार नाही, याची दक्षता घेऊन वेळीच फेलफूट काढून टाकाव्यात.
रोगनियंत्रण :
फळछाटणी होऊन काही बागेत प्रीब्लूम अवस्थेत घड दिसून येतात. सध्याच्या वातावरणाचा विचार करता द्राक्ष बागेत तापमान जास्त व आर्द्रतासुद्धा जास्त असल्याचा अनुभव येतो. याच बागेत सायंकाळी व सकाळी पानावर दवबिंदू दिसून येतील. अशावेळी पानांवर डाऊनीचा पुन्हा त्रास होण्याची समस्या आढळून येईल, तेव्हा ज्या ठिकाणी कॅनॉपीची गर्दी जास्त आहे, अशा ठिकाणी तळातील पाने काढून टाकल्यास गर्दी कमी करण्यास मदत होईल. त्याचसोबत शिफारशीत फवारणी केल्यास व्यवस्थित कव्हरेज मिळेल. या बागेत शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी घेऊन रोगनियंत्रणात ठेवावा.
कीडनियंत्रण :
जास्त आर्द्रतेमुळे बागेत फुलकिडी प्रादुर्भाव दरवर्षीपेक्षा या वर्षी जास्त असल्याचे आढळून येते. नवीन फुटींवर अजूनही हा त्रास दिसतो. नवीन पाने काढून टाकल्यास पानांवरील फुलकिडी घडावर पोचतील, तेव्हा शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करून वेळीच या फुलकिडीवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा मण्यांवर कीड पोचल्यास समस्या उद्‌भवतील.
थिनिंग :
लवकर छाटणी झालेल्या बागेत सध्या थिनिंगची कामे सुरू आहेत. घड जर सुरवातीसच सुटा झाला असल्यास आता जास्त थिनिंग करायची गरज नसेल; परंतु थिनिंग करतेवेळी सुरवातीच्या वरच्या तीन पाकळ्या तशाच ठेवून त्यानंतर घडाच्या परिस्थितीनुसार एका आड एक किंवा एकाआड दोन पाकळ्या अशा काढून घडातील मण्यांची संख्या ठेवावी. थिनिंग झाल्यानंतर लगेच बागेत शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. यामुळे मण्याला झालेल्या इजेपासून बचाव होईल.

1 आपली प्रतिक्रिया » :

Unknown म्हणाले...

द्राक्ष नविन फुटीतिल घड जिरन्याचे प्रमाण जास्त आहे उपाय सांगा

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................