द्राक्ष घड जिरण्याच्या समस्येवर उपाययोजना

द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर 10 ते 12 दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने तीन ते पाच पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते. हे लक्षात घेऊन बागेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
मागील लेखात आपण ऑक्‍टोबर छाटणीनंतर एकसारख्या फुटी काढण्यासाठी हायड्रोजन सायनाईडच्या वापराबद्दल तसेच द्राक्ष बागेत बोदाचे महत्त्व याबाबत माहिती मिळवली. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे ऑक्‍टोबर छाटणी हे कौशल्याचे काम आहे.ऑक्‍टोबर छाटणी ही प्रत्यक्षपणे उत्पादनाशी निगडित असते. एकसारख्या निघणाऱ्या फुटी व फुटीबरोबर दिसणाऱ्या घडांच्या संख्येवर पुढील हंगामाचे भवितव्य ठरलेले असते.
हायड्रोजन सायनामाईड लावल्यानंतर फुटी आठ ते 12 दिवसांत दिसू लागतात. द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर 10 ते 12 दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने तीन ते पाच पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड अथवा बाळी निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो व घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
घड जिरण्याच्या समस्येचे मूळ कारण जरी एप्रिल छाटणीतील व्यवस्थापन व त्या वेळीस होणारा वातावरणातील बदल असेल तरी या समस्येस बरीच कारणे आहेत.
घड जिरण्याची कारणे ः
1) उशिरा झालेली खरड छाटणी ः खरड छाटणी उशिरा झालेल्या बागांमध्ये खरड छाटणीनंतर अन्नसाठा तयार होणाऱ्या कालावधीमध्ये सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या येते.
2) खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान ः खरड छाटणी मुख्यतः सुप्त अवस्थेतील घडनिर्मिती घडवून आणण्याकरिता केली जाते. सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया चालू असताना वातावरणातील घटक अनुकूल नसल्यास पेशी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम घडनिर्मितीवर होतो किंवा अंशतः घडनिर्मिती होऊन प्रत्यक्षात फूट निघण्याच्या वेळी दिसून येणारा घड हा योग्य प्रकारे तयार होत नाही.
3) फुलोरा निर्मितीतील घटकांमधील बदल ः फळधारक डोळ्यांची निर्मिती तीन अवस्थांमधून होते. ऍनालाजेनची निर्मिती, फळधारक डोळ्यांची निर्मिती आणि फुलांची निर्मिती या तीन अवस्थांपैकी फुलोऱ्यांची निर्मिती ही अवस्था खूप महत्त्वाची असते. या अवस्थेच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये त्यात प्रकाश सायटोकायनिन, आरएनए (रायबोन्युक्‍लिक ऍसिड) बदल झाल्यास त्याचा परिणाम बाळी किंवा शेंडा निर्मितीमध्ये होतो.
4) सूक्ष्म घडांचे पोषण ः काडी तपासणी अहवालामध्ये अनेक वेळा पांढऱ्या घडांची नोंद असते, म्हणजेच सूक्ष्म घडनिर्मितीमधील पहिले दोन टप्पे व्यवस्थित पार पडलेले असतात; परंतु तिसऱ्या टप्प्यात खरड छाटणीनंतर 61 ते 90 दिवसांच्या कालावधीत काही कारणामुळे घडांचे पोषण योग्य प्रकारे होत नाही. त्यातच असे घड फुटीची वाढ होताना पावसाळी हवा असेल तर असे घड फुटींच्या वाढीच्या अवस्थेत जिरण्याची शक्‍यता जास्त असते. स्वच्छ हवामानात असे घड टिकून राहतात; परंतु वाढ फारशी समाधानकारक होत नाही.
5) वेलीतील अन्नसाठा ः खरड छाटणीनंतर काडी पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव, पाने गळणे किंवा नवीन फुटींची सतत वाढ या कारणांमुळे वेलींमध्ये पुरेसा अन्नसाठा होत नाही. या अगोदर सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या या परिस्थितीमध्ये यायला नको, तरी फुटींच्या वाढीसोबत घडाचा विकास होणे अडचणीचे ठरते.
6) बोद व पांढऱ्या मुळींची संख्या ः संशोधनाअंती आढळून आले, की बागांमध्ये छाटणीच्या वेळी वेलींच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेली पांढरी मुळे नसल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम घड जिरण्यात होतो. वेलींमध्ये मुळातच अन्नसाठा कमी त्यात मुळी कार्यक्षम नसल्याने तसेच पांढरी मुळे कार्यक्षम न करून घेतल्याने फूट बाहेर पडण्यासाठी आवश्‍यक जोम मुळांद्वारे मिळत नाही, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
7) ऑक्‍टोबर छाटणीतील चुका ः ऑक्‍टोबर छाटणी करताना झालेल्या चुकांमुळे वेलीवर कमी घड लागतात. योग्य ठिकाणी छाटणी न झाल्यामुळे घड जिरण्याची शक्‍यता कमी होते. हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करताना जास्त डोळ्यांना पेस्टिंग केली गेल्यामुळे जास्त डोळे फोडून निघतात. वेलीमध्ये अन्नसाठ्याचा अभाव असताना जास्त डोळे फुटल्यास फुटीचा जोम कमी राहतो. अन्नसाठ्याची विभागणी होते व घड जिरणे किंवा लहान येणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात.
ऑक्‍टोबर छाटणीनंतरच्या उपाययोजना ः
बागेच्या व्यवस्थापनात झालेल्या काही चुका तसेच काही घटकांचा ऑक्‍टोबर छाटणीशी असणारा प्रत्यक्ष संबंध याचा विचार करता या समस्येवर ऑक्‍टोबर छाटणीनंतर कशाप्रकारे मात करता येईल यासाठी काही उपाययोजना करणे आवश्‍यक असते.
1) खरड छाटणी शक्‍यतोवर उशिरा करू नये.
2) द्राक्ष काडीची घडासाठी तपासणी करावी ः ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी द्राक्ष काडीची तपासणी करून काडीवरील डोळ्यांमधील घडांची परिस्थिती समजावून घेणे आवश्‍यक आहे. सुरवातीच्या डोळ्यांमध्ये घडनिर्मिती चांगली झालेली असते तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन छाटणी केल्यास चांगली घडनिर्मिती झालेले डोळे उपयोगात येऊ शकतात.
3) ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी ताण देणे ः छाटणीअगोदर ताण दिल्यास पानांमधील अन्नसाठा द्राक्ष काडीकडे व डोळ्यांकडे वळविला जाऊन त्याचा फायदा नवीन फुटीस होईल व एकसारखी फूट निघण्यास मदत होईल.
4) योग्य छाटणी व एकसारखी फूट ः योग्य छाटणी व नियंत्रित डोळ्यांमधून एकसारखी फूट काढणे यास देखील महत्त्व आहे. काडीवरील जितके जास्त डोळे फुटून येतील तेवढा अन्नसाठ्याचा व्यय जास्त होईल. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घड जिरण्याची समस्या उद्‌भवू शकते. म्हणूनच नेमके डोळे फुटून येण्यासाठी छाटणी व पेस्टिंगद्वारे उपाययोजना करावी. हायड्रोजन सायनामाईडचे प्रमाण योग्य वापरून पेस्टिंग करताना नेमकेच डोळे फोडून काढावेत व नंतर साधारणतः एका काडीवर एक घडाची फूट व विस्ताराच्या दृष्टीने काही वांझ फुटी राखाव्यात.
घड जिरण्याची समस्या दिसत असल्यास वाढ विरोधकांचा वापर करावा. सध्या सीसीसी सारख्या वाढविरोधकास मनाई नसली तरी त्यावरील प्रयोग सुरू असल्यामुळे ते वापरणे इष्ट होणार नाही म्हणून दुसरे वाढविरोधके वापरू नयेत. वेलीच्या वाढीचा वेग हा पाणी तसेच नत्र यांच्या नियंत्रणाने कमी करावा. या वेळी वेलीच्या वाढीचा वेग मंदावणे गरजेचे असते. त्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा योग्य वापर करावा. त्यामध्ये जास्त रसायनाचा वापर टाळावा व जोपर्यंत घड व्यवस्थित होत नाही तोपर्यंत नत्र तसेच जीएचा वापर करू नये. या दरम्यान सी. विड एक्‍सट्रॅक्‍ट किंवा तत्सम रसायनांचा वापर टाळावा. घडात सुधारणा दिसू लागल्यानंतर जीएच्या फवारणीस सुरवात करावी.
5) जमिनीचे व्यवस्थापन ः पांढऱ्या मुळींची संख्या बरेच प्रमाणात घड जिरण्याच्या समस्येसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी जमिनीचे व्यवस्थापन करायला हवे. जमिनीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी बोद हलकेसे हलवून मोकळे करावेत. तसेच पांढऱ्या मुळीच्या वाढीस पोषक वातावरण तयार करणे आवश्‍यक असते.
या वर्षीच्या सध्या परिस्थितीमध्ये घड जिरण्याची समस्या जास्त प्रमाणात उद्‌भवणार नाही; परंतु अनियमित पावसामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवू शकते. एप्रिल छाटणी उशिरा झालेल्या द्राक्ष बागांमध्ये ही समस्या उद्‌भवू शकते. त्यामुळे त्यांना वरील काही उपाययोजना फायदेशीर ठरतील. शेवटी प्रत्येक बागेतील परिस्थिती वेगवेगळी असेल व अशाप्रकारे एकसुरी विश्‍लेषण फायद्याचे ठरणार नाही. तेव्हा समस्येचे मूळ शोधण्याकरिता बागेत केल्या जाणाऱ्या कामाची नोंद ठेवून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचा सल्ला घ्यावा.

2 आपली प्रतिक्रिया » :

nathe hemant म्हणाले...

Purpul draksh bagever jast ghar saale nahi upay sanga

Unknown म्हणाले...

सर माझं बाग २०% पोंगा स्टेज आहे पण घड खुपचं लहान आहेत टिकणे कठिण आहे काय करु ९८३४२२५८१३

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................