संजीवकांचा वापर

द्राक्ष बागेत अनेक संजीवकाचा वापर केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने इथ्रेल (इथिलीन),जिब्रेलिक अ‍ॅसिड, लिहोसीन, सिक्स बीए ,ब्रासोनो  (पोषक ) सीपीपीयु यांचा वापर करण्यात येतो.ही संजीवके वापरतांना फारच काळजी घ्यावी लागते त्यांचे प्रमाण कश्या प्रकारे घ्यावे याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे-
१) ईथ्रेल (इथिलीन): ऑक्टोबर छाटणी पूर्वी साधारणता दोन आठवडे या संजीवकाचा वापर पानगळ करण्यासाठी केला जातो.१००० ते २५०० पीपीएम तीव्रतेचे द्रावण फवारले असता छाटणी पर्यत पाने ९० % पर्यत पानगळ होते.तसेच छाटणी योग्य डोळावर करणे सोपे जाते.तसेच छाटणीनंतर डोळे लवकर फुटण्यास मदत होते.
प्रमाण - ईथ्रेल  १२५ मिली ९९ लिटर पाणी -५०० पीपीएम
              ईथ्रेल  १५० मिली ९९ लिटर पाणी -१००० पीपीएम
             ईथ्रेल  ५०० मिली ९९ लिटर पाणी -२००० पीपीएम
             ईथ्रेल  ६२५ मिली ९९ लिटर पाणी -२५०० पीपीएम
२.जिब्रेलिक अ‍ॅसिड : जिब्रेलिक अ‍ॅसिड हे जीब्रेलीन गटातील असून याच्या मुळे पेशी लांबट होतात.घडाच्या पाकळ्या, मण्यांचे  देठ आणि मणी आकार लांबट करण्यासाठी जिब्रेलिक अ‍ॅसिड उपयोग होतो.ऑक्टोबर छाटणीनंतर घड कोवळा असतांना हे संजीवक घडावर वापरावे.घड पोपटी हिरवा असतांना १० पी.पी.एम द्रावणाची फवारणी करावी.यामुळे घडाची लांबी वाढून पाकळ्या मोकळ्या होतात
जर आपणास पहिली बुडवणी (डीप) करावयाची नसल्यास पहिल्या फवारणीनंतर दर पाच दिवसांनी पुन्हा १५ ते २० पीपीएम ने फवारणी करावी. यानंतर पुन्हा पाच दिवसांनी २० पीपीएम ने फवारणी करावी.एकूण तीन फवारण्या घ्याव्यात.
जिब्रेलिक अ‍ॅसिड द्रावण तयार करण्यासाठी प्रमाण:
एक ग्रॅम जीए + ३० मिली अ‍ॅसिटोनमध्ये विरघळून घ्यावे.त्यात क्षारविरहित स्वछ पाणी मिसळुन एक लिटर द्रावण करावे. यास मुळ द्रावण (स्टॉक सोलुशन) असे म्हणतात.
वेगवेगळ्या तीव्रतेचे द्रावण तयार करण्यासाठी :-
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ९९ लिटर पाणी - १० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ४९ लिटर पाणी - २० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- ३९ लिटर पाणी - २५ पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- २४ लिटर पाणी - ४० पी पी एम
१ ग्रॅम जीए , १ लिटर मुळ द्रावण- १९ लिटर पाणी - ५० पी पी एम
जिबरेलीक अ‍ॅसिड वापरण्यासाठी घडाची अवस्था आणि संजीवकाची तीव्रता याचा मेळ घालणे महत्त्वाचे असते.
३. क्लोरमॅक्कॉट (लिहोसीन):
क्लोरमॅक्कॉट,सायकोसील,सीसीसी,मेपीकॉट क्लोराईड, आणि  लोहोसीन इत्यादि नावाने हे संजीवक ओळखले जाते.हे संजीवक वाढ निरोधक म्हणून काम करते.ऐनवेळी पाऊस पडला तर कोवळी फुट जोमाने वाढते. अशा वेळी घडापुढील शेंडा लवकर वाढतो. त्यामुळे घडांचा जोम मंदावतो या वेळी शेंड्याचा जोम थांबविण्यासाठी वाढ विरोधक संजीवकाचा वापर आवश्यक असतो. पावसाप्रमाणे काही बाबीमुळे सुद्धा शेंडा वाढीस चालना मिळते अशा वेळी हे संजीवक वापरूनसंभाव्य नुकसान टाळावे. ऑक्टोबर छाटणीनंतर घड आणि घडांची फुट वाढीचा काळात फुटीचा शेंडा जोमाने वाढतो वेलीत वाढलेल्या अन्नरसात वाढ चालू असते. फुटीच्या पाचव्या सहाव्या डोळ्यातून घड बाहेर येतो खोडाकडील अन्न रसाचा ओध शेंडा वाढीकडे असल्याने घडाचे पोषण मंदावते. याचा परिणाम घडांचा दर्जा खालवण्यात होतो. शेंडा वाढ थांबवून अन्नरसाचा ओघ घडाकडे वळवल्यास घडांचा दर्जा सुधारतो आणि हेच काम संजीवके करतात
द्राक्षासाठी लिहोसीन वापरण्याची अवस्था :
ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन फुटीचा ५,६ व्या डोळ्यातील.घड कोवळा असतांना म्हणजे त्यांचा रंग पिवळट
अगर पोपटी असतांना हे संजीवक वापरावे. वेलीवर सर्वच घडाची आणि फुटीची अवस्था एक सारखी नसते. लिहोसीनचा वापर करताच सर्वच शेंड्यांचा जोम मंदावतो आणि तो घडाकडे वळतो. पानांची कर्बग्रहण शक्ती वाढते.शेंड्याकडील अन्नरसाचा ओघ थांबल्यामुळे आणि नवीन पानांची कर्बग्रहणशक्ती वाढल्यामुळे असा दुहेरी अन्नरस घडांना मिळाल्यामुळे घडाचा पोत सुधारतो.सर्व घडांची अवस्था समान पातळीवर येते आणि परिणामी जीब्रालिक असिडचा वापर सुलभ रित्या करता येतो.
द्रावणाची तीव्रता :    
योग्य वेळी वापर केल्यास २५० पीपीएम तीव्रतेचे द्रावण योग्य ठरते.पाहिजे असणा-या अवस्थेपूर्वी एक दिवस अगोदर कमी तीव्रतेचे म्हणजे पीपीएम द्रावण आणि दोन दिवस आगोदर १२५ पीपीएम चे द्रावण वापरावे.या उलट उशीर झाला तर ३७५ किंवा ४५० पीपीएम तीव्रता वापरावी. परंतु ५०० पीपीएम पेक्षा जास्त तीव्रतेचे संजीवक वापरने नुकसानीचे ठरते.सध्या बाजारात लिहोसीन हे संजीवक उपलब्ध आहे.त्याची तीव्रता ५०% असून ते द्रवरूपात उपलब्ध होते.ते पाण्यात मिसळते.
१०० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -१००० पीपीएम 
५० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -५०० पीपीएम
२५ मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -२५० पीपीएम
२० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -१२५ पीपीएम
४० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -२०० पीपीएम
६० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी- ३०० पीपीएम
७५ मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -३७५ पीपीएम
९० मि.ली लिहोसीन -१०० लिटर पाणी -४५०पीपीएम
लिहोसीन  वापरतांना घ्यावयाची काळजी :
हे संजीवक वापरतांना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.संजीवक फवारतांना शेड्याकडील भागावर एकसारखी फवारणी करावी.फुटीवर ६ ते ७ पाने असतांना तसेच घडापुढे ५-६ पाने असतांना हे संजीवक अधिक परिणामकारक ठरते.
४) सिक्स -बी ए :
   हे संजीवक कायनेटिक या गटात मोडते.पेशीचे विभाजन करण्याच्या गुणधर्मामुळे द्राक्ष भरदार होतात. पानात अधिककर्ब ग्रहण होते.त्यामुळे फळाचे वजन आणि गोडी वाढण्यास मदत होते.फलधारणा पूर्ण झाल्यावर लगेच हे संजीवक १० ते १५ या तीव्रतेने पीपीएम फवारावे.जीब्रालिकच्या फवारण्या झाल्यानंतर गडलिंग करण्यास उशीर होत असल्यास हे संजीवक वापरावे.  
सिक्स बीए च्या जास्तीत जास्त दोन फवारण्या आणि एकूण २० पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात वापर करावा.सिक्स बीए संजीवक आयसोप्रोपाईल अल्कोहोल मध्ये विरघळून घ्यावे.
५.एनएए: नॅपथेलिक अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड : य़ा संजीवकाचा द्राक्षात वापर काही विशिष्ट कारणासाठी केला जातो.मोहरगळ अथवा लहान फळ गळ थांबवण्यासाठी या संजीवकाचा उपयोग होतो.घड फुलो-यातून बाहेर पडल्यापासून तर मणी ज्वारीच्या आकाराचे होईपर्यंतच्या काळात होणारी गळ थांबवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.यासाठी सुरुवातीस २० पीपीएम तिव्रतेचे द्रावण वापरावे.फलधारनेनंतर एनएए संजीवक वापरले असता फळावरील लव (नॅचरल ब्लूम ) चांगली येते.काढणीपूर्वी मणीगळ कमी होते.तसेच एक आठवडा काढणी लांबवता येते.द्राक्ष काढणीपूर्वी कोणतेही संजीवक २५ दिवस आगोदर वापरू नये.

2 आपली प्रतिक्रिया » :

virendra Raosahb zambre म्हणाले...

best information thank you

Unknown म्हणाले...

अतिशय सुंदर पध्दतीने सांगितले आहे ,

टिप्पणी पोस्ट करा

द्राक्ष बागे विषयी आपली कोणतीही समस्या आम्हाला लिहून पाठवा.आम्ही आपल्या समस्याचे निश्चितच निरसन करू.प्रश्न तुमचा उत्तर तज्ञाकडून दिले जाईल.

.........................................................